हे स्थलांतर काही मनमर्जीने होत नाही. माणसांनी पाळलेल्या म्हशींचं हे स्थलांतर आहे. दर वर्षी ओडिशाच्या जगतसिंगपूर जिल्ह्यातले गवळी लोक म्हशींचे कळप देवी नदी पार करून नेतात. हे सगळं घडतं ते कडक उन्हाळ्यात. पल्याडच्या किनाऱ्यावरच्या नव्या कुरणांच्या शोधात. आणि नंतर त्या म्हशी पोहत माघारीही येतात. सेरेनगेट्टी अभयारण्यातल्यासारखं भव्य नसलं तरी हे एक विलक्षण दृश्य आहे हे निश्चित.
एक दिवस नहाराना ग्राम पंचायतीजवळ मी हा सगळा ताफा पाहिला. गाव देवी नदीच्या किनारी हे गाव वसलं आहे. देवी नदी ओडिशाच्या पुरी आणि जगतसिंगपूर या किनारी जिल्ह्यांमधून वाहते आणि ती महानदीची मुख्य शाखा आहे.

नहाराना ग्राम पंचायतीतल्या गंदाकुला गावाजवळचा देवी नदीचा काठ. उजवीकडचा भूभाग म्हणजे मनु धिया (मनुचं खोरं)
नहराना ग्राम पंचायतीच्या भोवताली असणाऱ्या गावांमध्ये अनेक मच्छीमार समुदाय राहतात. देवी नदी हीच त्यांच्या उपजीविकेचा मुख्य स्रोत आहे. या किनारी प्रदेशात अनेक गवळ्यांचे समुदायही राहतात. इतरही अनेक कुटुंबांकडे गुरं आहेत ज्यांच्यापासून त्यांना जास्तीचं उत्पन्नही मिळतं.
ओडिशा राज्य सहकारी दूध उत्पादक संघाचं इथे चांगलं बस्तान बसलं आहे. गवळी आणि ज्यांच्या गाई-म्हशी आहेत त्यांना दूध कुठे घालायचं याची चिंता करण्याची गरज नाही कारण दूध संघ त्यांच्याकडून दूध संकलित करतो.

देवीच्या काठावर मच्छीमार जाळ्यातून मासे काढतायत, इथे खाऱ्या पाण्यातले मासे मोठ्या संख्येने मिळतात
नहरानापासून खाडी जास्तीत जास्त १० किलोमीटरवर आहे. आणि नदीचं मुख रुंद असल्याने इथे अनेक छोटी खोरी तयार झाली आहेत. ज्यांच्या जमिनी कालांतरात नदीच्या पात्रात गेल्या आहेत ते गावकरी या खोऱ्यांमध्ये अधून मधून शेती करतात किंवा वस्त्या उभारतात. ही खोरी म्हणजे या भागातली सर्वात जास्त हिरवळ असणारी गायरानं आहेत.
शेजारच्या ब्रमुंडली ग्राम पंचायतीतल्या पातारपाडा गावातल्या एक गवळ्याचं घर त्यांच्या मालकीच्या १५० म्हशींचं दूध विकतं. परंपरेने जमीनदार नसलेल्या अशा कुटुंबांसाठी गोठा बांधणं किंवा त्यांच्या म्हशीच्या दलासाठी गायरानं शोधणं सोपं काम नाहीये. मग देवी नदीचे काठ आणि खोरं त्यांच्या मदतीला येतं. म्हशींचे मालक या खोऱ्यातल्या गायरानांवर म्हशी चरू द्याव्यात म्हणून दर वर्षी या जमिनींच्या मालकांना तब्बल दोन लाख रुपये इतकी रक्कम अदा करतात. दिवसा या म्हशी या गायरानांवर चरण्यासाठी पोहत जातात. पावसाळ्यात या खोऱ्यात गोड्या पाण्याची तळी तयार होतात तोपर्यंत हा दिनक्रम चालू राहतो आणि याच तळ्यांवर नंतर म्हशी पाण्याला जातात.
ओल्या चाऱ्यासाठी गायरानांच्या शोधात निघालेल्या या म्हशींचा एका बाजूचा प्रवास पुढील छायाचित्रांमध्ये टिपला आहे.

सुरूच्या बनातला आपला तात्पुरता मुक्काम हलवून म्हशी निघतात

रस्ता आणि खोऱ्याच्या मध्ये नदीचं पात्र सर्वात अरुंद असतं तिथपर्यंत या म्हशी नदीच्या काठाकाठाने चालत जातात, जेणेकरून त्यांना कमीत कमी अंतर पोहावं लागेल

म्हशी वाट सोडून नदी पार करण्यासाठी पाण्याच्या दिशेने चालल्या आहेत. काही जणी जरा घुटमळतायत, बाकीच्या खुशीत उड्या टाकतात

तीन दिवसांची एक कालवड आपल्या आईबरोबर पाण्यात शिरते

म्हसरं कळप करून पोहतात. त्यांचे गुराखी मोटरबोटमधून त्यांच्या दलासोबत जातात

सुरक्षिततेसाठी आणि दुबळ्या सदस्यांच्या खास करून पिलांच्या रक्षणासाठी त्या कळपाने पोहतात. जे पोहण्यात कच्चे आहेत ते पाण्याच्या वर राहण्यासाठी इतरांवर रेलतात

नदीच्या मध्यापर्यंत कळपाने मदत केल्यानंतर मात्र तीन दिवसाच्या या कालवडीचं पोहण्याचं प्रात्यक्षिक थांबतं. इतरांइतक्या वेगाने तिला पोहायला जमत नाही आणि ती मागे पडते. आई म्हैस देखील हतबल होते

गुराखी बोटीतून कालवडीजवळ जातो आणि तिला उचलून बोटीत घेतो

तिला जरा हायसं वाटत असलं तरी ती पूर्णपणे निर्धास्त दिसत नाही

आपल्या आईचं लक्ष जावं म्हणून ती रेकत राहते

आई म्हैस बोटीकडे आणि आपल्या कालवडीकडे वळू वळू पाहत राहते, बाकी दल पुढे निघतं

काठावर पोचल्या पोचल्या कालवड टुणकन उडी मारून आपल्या पायावर उभी राहते, कधी एकदा आईपाशी जातीये असं तिला होतं

मनु धियाच्या काठावर दल पोचलंय

पहिल्यांदा पिलाला बोटीतून खाली उतरवतात

आई म्हैस येते आणि पिलाला प्रेमाने जवळ घेते

बाकीचे सगळे खोऱ्याच्या काठावर पोचल्या पोचल्या आपल्या कामाला लागतात

एक आडदांड रेडा बाकी कळपापासून दूर निवांत चरतोय

आई म्हैस कुरणाच्या दिशेने निघते, पिलू तिच्या मागे जातं

आपला कळप खोऱ्यात सुखरुप पोचवल्यानंतर गुराखी गावी परततात
अनुवादः मेधा काळे