अब्दासा तालुक्यातील मोहाडी गावाजवळील महासागरातील बेटावरून उंट - जवळपास ४० - पोहत पोहत मुख्य भूमीवर आले. फकिरानी जाट समाजातील इस्माईल जाटच्या मालकीचे ते उंट होते.
माझा माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता - उंटांना पोहता येतं? पण हे एकदम भारी असे खराई उंटा होते, मार्च –एप्रिलचा असह्य उन्हाळा ते जुलैच्या मध्यापर्यंत ते तीन चार दिवस खारफुटी वनस्पती असणाऱ्या बेटावर चरत काढतात. नंतर हे उंट तीन किलोमीटर उलटं पोहत किनाऱ्यावरील गावात येतात, तिथून पुरेसं पिण्याचे पाणी पिऊन घेतात आणि परत त्या बेटावर जातात.
उंटांबरोबर त्यांचे गुराखी असतात जे गुजरात मधील उंट मालधारी समाजाचे आहेत. दोन पुरुषांचा गट असतो, ते दोघे उंटाबरोबर पोहत जातात किंवा एक जण छोट्या बोटीने पाणी आणि रोट्या वगैरे आणतो आणि परत गावात परत येतो. दुसरा गुराखी उंटांबरोबर बेटावरच राहतो. तिथे तो जवळचं थोडं फार खाणं आणि उंटाचं दूध असं खातो. उंटाचं दूध हा या समाजाच्या लोकांच्या आहारातला महत्वाचा भाग आहे.
एकदा पावसाळा सुरु झाला की मालधारी उंटांना त्या बेटावरच ठेवतात. सप्टेंबरच्या मध्यावर ते प्राण्यांना परत घेऊन येतात आणि पावसाच्या पाण्यावर वाढलेल्या कुरणांवर तसंच किनाऱ्यावरच्या खाजणांमध्ये चरायला घेऊन जातात. (पहाः चराऊ कुरणांचा अंतहीन शोध)
मी २०१५ मध्ये प्रथम उंटांना पोहताना पाहिलं. मी मोहाडीतून एका मालधारीबरोबर उंटांच्या संगतीने बोटीने गेलो होतो, पण सीमा सुरक्षा दलाची (BSF) परवानगी नसल्याने थेट बेटापर्यंत जाऊ शकलो नाही. या भागात पाकिस्तानची सीमा येत असल्याने तिथे येण्या-जाण्यावर सीमा सुरक्षा दलाच्या चौकीची पाळत असते. तितक्यात क्षितिजरेषेवर उंट पाण्यात पोहत दिसेनासे होऊ लागले.
नंतर इस्माईल यांनी मला सांगितलं की, गुजराती भाषेत ‘खराई’ म्हणजे खारट. हे उंट अशा विशिष्ट प्रजातीचे आहेत की जे बदलणाऱ्या परिस्थितीकीशी म्हणजेच किनाऱ्यावरील खारफुटी वनस्पती आणि हिरवी कुरणे अशा बदलांशी सहज जुळवून घेतात. त्यांच्या आहारात अनेक प्रकारच्या वनस्पती, झाडोरा आणि खारफुटी वनस्पती असतात. पण त्यांनी जास्त काळ खारफुटी वनस्पती खाल्ली नाही तर, हा काटक प्राणी आजारी पडतो आणि खंगू लागतो.
कच्छ मध्ये रबारी आणि फकिरानी जाट या दोन पशुपालक जमातीतील लोक खराई जातीचे उंट पाळतात. सामा समाजातील लोक उंट पाळतात पण खराई जातीचे नाहीत. गुजरातमध्ये जवळपास ५,००० खराई उंट आहेत, अशी नोंद कच्छ उंट उच्चेरक मालधारी संघाने केली आहे.
त्यातले २००० खराई उंट कच्छ जिल्हयात आहेत, जिथे बेटांचं आणि कांदळवनांचं प्रचंड मोठं जाळं आहे. पण कधी काळी जोमाने वाढत असलेलं हे जंगल आता हळूहळू कमी होत आहे. आणि त्या जागी मिठागरं आणि उद्योगधंदे उभारले जात आहेत. मोठाली कुरणंदेखील सरकारने संरक्षित प्रदेश म्हणून जाहीर केली आहेत आणि त्यातला बराचसा भाग हा गांडो बावड म्हणजेच विलायती बाभळीने व्यापला आहे.
जुलै २०१८ मध्ये मी जिल्ह्याचं ठिकाण असलेल्या भूजपासून ८५ किमी. अंतरावर असणाऱ्या भचाऊ तालुक्याला भेट दिली, हे गाव हमरस्त्यापासून काही किमी आत आहे. मी आधी आलो होतो तेव्हापेक्षा या वेळी प्रचंड मोठ्या प्रमाणात मिठागरं दिसून आली. नंतर मी या तालुक्यातील अमालीयारा भागात मुबारक जाट आणि त्यांच्या कुटुंबाला भेटलो, ते त्यावेळी सगळ्या बाजूने चिखलाने वेढलेल्या एका छोट्या टापूवर राहात होते. त्यांच्या मूल्यवान ३० उंटांसाठी आता कांदळवनं जवळ जवळ संपल्यासारत जमा होती. “आता इथून पुढे कुठे जावं काही कळत नाही,” ते म्हणाले. “कुठेही हिरवा चारा राहिलेला नाही, तगून राहण्यासाठी आम्ही सतत ठिकाणा बदलत आहोत, पण असं किती काळ करणार? पहावं तिथे मिठागरं झाली आहेत.”
या वर्षी कच्छ उंटपालक संघटनेने मोठ्या प्रमाणावर मिठागरांसाठी भाडे पट्ट्याने जमिनी देणाऱ्या दीनदयाळ पोर्ट ट्रस्टच्या विरोधात, राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका केली आहे. मार्च २०१८ मध्ये लवादाने अंतरिम निकालाद्वारे कांडला ते सुरजबारी भागातील भाडेपट्ट्याने घेतलेल्या जमिनींमध्ये मिठागरं थांबवली आहेत. गुजरात राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि गुजरात किनारपट्टी व्यवस्थापन विभाग आणि इतर प्रशासकांना बारकाईने तपासणी करण्याचे आदेश दिले आहे. तपासणी अहवाल एप्रिल मध्ये दाखल करण्यात आला होता. खटला कोर्टात चालू आहे.
नंतर मी जुलै मध्ये गेलो, तेव्हा काही दिवस मी लखपत तालुक्यात राहिलो, भचाऊपासून २१० किमीवर. या ठिकाणी अनेक फकिरानी जाट कुटुंबं राहतात. पण या समाजातील बरेचसे लोक आता भटकंती करत नाहीत. त्यांच्या सांगण्यानुसार याचं कारण म्हणजे, त्यांच्या खराई उंटांना चरण्यासाठी आता हिरवी कुरणं राहिलेली नाहीत. मोरी गावातील करीम जाट म्हणतात की, “मला माझं पारंपारिक आयुष्य सोडून द्यायचं नव्हतं, पण मला ते सोडावं लागलं. पाऊस कमी कमी होत चालला आहे. खारफुटी वनस्पती सुद्धा कमी होत चालली आहे किंवा तो भाग संरक्षित केला आहे, त्यामुळे आम्ही आमची जनावरं तिथे घेऊन जाऊ शकत नाही. मग आम्ही करावं तरी काय? हे उंट आमच्या कुटुंबाचे सदस्य आहेत. त्यांचे हाल बघून आतड्याला पीळ पडतो.”

अनेक शतकांपासून गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातली कांदळवनं या प्रदेशाच्या परिस्थितिकीसाठी मोलाची ठरली आहेत आणि खराई उंटांसाठी महत्त्वाचं खाद्यही

खराई उंट किनारी परिस्थितिकीशी जुळवून घेणारी एकमेव प्रजात आहे आणि केवळ याच प्रजातीच्या उंटांना पोहता येतं. आता गुजरातमध्ये केवळ ५००० उंट शिल्लक आहेत

खारफुटीच्या शोधात लखपत तालुक्यातल्या कच्छच्या आखातातून जवळच्या टापूपर्यंत पोहत जाणारे खराई उंट. ते खुल्या समुद्रात १० किलोमीटरपर्यंत पोहू शकतात. पशुपालक असणाऱ्या मालधारी समुदायाचे लोक त्यांना पोहताना आणि नंतर टापूवरच्या मुक्कामात सोबत करतात

भचाऊ तालुक्यातल्या जांगी खाडीतल्या खारफुटीवर ताव मारणारे खराई उंट. त्यांच्या चरण्यामुळे परागीभवन होऊन खारफुटी नव्याने उगवायला मदत होते

या तालुक्यातल्या घनदाट कांदळवनांची जागा हळू हळू आणि चलाखीने मिठागरांनी गिळंकृत करायला सुरुवात केली आहे

यंत्रांच्या मदतीने बांध घातले जातात जेणेकरून भरतीचं पाणी आत घुसणार नाही – परिणामी खारफुटी आणि या परिसंस्थेतल्या अनेक वनस्पती आता मरू लागल्या आहेत

मुबारक जाट सांगतात की त्यांच्या कळपासाठी चराऊ जागाच राहिल्या नाहीत. ते भचाऊच्या चिराई मोती गावातल्या मिठागरांच्या मधोमध असणाऱ्या एका टापूवर आपल्या उंटांसह मुक्काम करतायत

चराऊ जागा झपाट्याने कमी होत चालल्या आहेत, परिणामी आपल्या उंटांसाठी कुरणांच्या शोधात भटक्या फकिरानी जाटांना खूपच थोड्या थोड्या काळात आपला मुक्काम हलवायला लागतोय

करीम जाट आणि याकुब जाट ध्रांगावांध पाड्यापाशी आपल्या खराई उंटाला औषध पाजताना – बराच काळ आहारात खारफुटी नसल्याने आणि शोष पडल्याने हा उंट आजारी पडला होता

लखपत तालुक्याच्या मोरी गावातल्या फकिरानी जाटांपैकी एक, करीम जाट ज्यांनी उंटांसाठी चरायला पुरेशा जागा नाहीत म्हणून आत भटकंती करणं सोडून दिलंय. “मालधारी परेशान झालेत,” ते म्हणतात. “गवत नाही, त्यामुळे चरायला काहीच नाही, आम्ही चारा पण विकत घेऊ शकत नाही. इथे पाऊसच झाला नाहीये, आम्हाला फार मोठा घोर लागून राहिलाय...”

१३ वर्षांचा सुलेमान जाट म्हणतो, “मला माझ्या बापाप्रमाणे गुराखी व्हायचंय. पण मी मोठा होईपर्यंत चरण्यासाठी काही जागा उरल्या असतील का काय माहित.”

भचाऊ तालुक्यामत, चिराई नानी गावापासून थोड्याच अंतरावर हताश झालेले अयुब अमीन जाट पडक जमिनीवर चराऊ कुरणांच्या शोधात निघालेत
रमेश भट्टी भूजस्थित कार्यक्रम संचालक आहेत आणि दिल्ली येथील सेंटर फॉर पॅस्टोरॅलिझम या संस्थेत गटप्रमुख आहेत. नैसर्गिक संसाधन संवर्धन, पशुपालन विकास, उपजीविका आणि लिंगभावाच्या मुद्द्यांवर ते काम करतात.
अनुवादः अश्विनी बर्वे