“जेव्हा ही मोठाली झाडं उन्मळून, तुटून पडलेली पाहतो ना तेव्हा असं वाटतं जसं काही पोटची लेकरंच गेली आहेत,” चाळिशी पार केलेले माळी मदन बैद्य म्हणतात. “माझं अख्खं आयुष्य मी या झाडांसोबत-वेलवनस्पतींसोबत काढलंय,” ते सांगतात. आजूबाजूला झालेल्या संहाराचा प्रचंड धक्का त्यांना बसलाय. “ही काही फक्त झाडं नाहीयेत. किती तरी पक्षी आणि फुलपाखरांसाठी निवारा आहेत ही झाडं. उन्हापासून सावली देतात, पावसापासून छप्पर.” कोलकात्याच्या ईस्टर्न मेट्रोपोलिटन बायपासवरची, शहीद स्मृती कॉलनीतली त्यांच्या घराजवळच्या बैद्यंच्या रोपवाटिकेचं प्रचंड नुकसान झालंय.
२० मे रोजी अम्फान वादळात किमान ५,००० झाडं उन्मळून इतस्ततः फेकली गेली असल्याचा कोलकाना महानगरपालिकेचा अंदाज आहे. ‘अति तीव्र चक्रीवादळ’ या वर्गात मोडणारं अम्फान पश्चिम बंगालच्या किनारी भागात धडकलं तेव्हा त्याचा वाऱ्याचा वेग ताशी १४०-१५० किलोमीटर होता आणि वाऱ्याचे झोत तर ताशी १६५ किमी वेगाने वाहत होते. वादळादरम्यान २४ तासात २३६ मिमी पाऊस झाला असं भारतीय वेधशाळेच्या अलिपोर शाखेच्या नोंदी सांगतात.
अम्फानमुळे ग्रामीण भागात, खासकरून सुंदरबनसारख्या भागांमध्ये काय नुकसान झालंय याचा आताच्या घडीला अदंजा बांधणं देखील शक्य नाहीये. नॉर्थ २४ परगणा आणि साउथ २४ परगणा आणि कोलकात्याला प्रचंड तडाखा बसला. राज्यभरात आतापर्यंत ८० जणांचा बळी गेला, ज्यातले १९ कोलकात्यातले आहेत.
अनेक भागांचा संपर्क आजही तुटलेला आहे. दळणवळणाची साधनं, रस्त्यांचं नुकसान त्यात सध्याच्या टाळेबंदीचे निर्बंध म्हणजे तिथे कुणालाही जाणं जवळपास अशक्य झालं आहे. अर्थात टाळेबंदीमुळे निर्माण झालेल्या समस्या त्या पलिक़डच्या आहेत. सगळ काही पूर्वपदावर आणणं अतिशय अवघड होऊन बसलंय कारण एरवी ज्या कामगारांनी हे सगळं काम केलं असतं ते शहर सोडून आधीच इथल्या किंवा इतर राज्यातल्या आपापल्या गावी निघून गेले आहेत.

दुसऱ्या दिवशी सकाळी, २१ मे रोजी कॉलेज स्ट्रीटवरती हजारो पुस्तकं आणि पुस्तकाची पानं पाण्यावर तरंगत होती
उन्मळून पडलेल्या झाडांशेजारीच रस्त्यावरच्या पाण्यामध्ये हजारो पुस्तकं आणि पुस्तकांची पानं कोलकात्याच्या ऐतिहासिक कॉलेज स्ट्रीटवर पाण्यात तरंगत होती. या परिसरात असणाऱ्या अनेक कॉलेज आणि शैक्षणिक संस्थांमुळे या रस्त्याला असं नाव पडलं असलं तरी हा भाग बोई पारा म्हणूनही ओळखला जातो. सुमारे १.५ किलोमीटरचा हा परिसर म्हणजे भारतातल्या सर्वात मोठ्या पुस्तकांच्या बाजारपेठांपैकी एक आहे. एरवी पुस्तकांच्या या छोट्याशा दुकानांमागच्या भिंतीही पुस्तकांनीच सजलेल्या असतात. आता मात्र त्या ओक्याबोक्या दिसतायत – आणि अनेक भिंतींची पडझड झालेली दिसतीये. वर्तमानपत्रातल्या बातम्यांनुसार या वादळात ५० ते ६० लाखाची पुस्तकं खराब झालीयेत.
इथली आणि इतर ठिकाणच्या छोट्या छोट्या टपऱ्या, पत्र्याची खोपटं देखील उखडून पडलीयेत. किती घरं पडली त्याची तर गणतीच नाही. फोनचा संपर्क तुटला आणि विजेचे खांबही पाणी साचलेल्या रस्त्यांवर उखडून पडले. विजेच्या धक्क्याने काही बळीही घेतले. काही भागांमध्ये अजूनही वीज आलेली नाही. आणि विजेचा पुरवठा करणारं कलकत्ता वीज वितरण महामंडळ वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी अखंड प्रयत्न करतंय. आणि, बऱ्याचशा भागांमध्ये अंधाराचं साम्राज्य असल्याने जिथे वीज-पाणी मिळत नाहीये तिथे रहिवासी निदर्शनं करत रस्त्यावर उतरले आहेत.
“अगदी कालच मोबाइल फोन सुरू झालाय,” कोलकात्याच्या नरेंद्रपूर भागात स्वयंपाकाचं काम करणारी ३५ वर्षांची सोमा दास सांगते. “आता आमचा फोन चार्ज करता आलं नाही तर आम्ही काय करायचं? आम्ही त्या दिवशी पावसाचं पाणी भरून ठेवलंय. आता तेच उकळून आम्ही प्यायला वापरतोय. आमच्या भागातल्या पाण्याच्या सगळ्या वाहिन्यांमधलं पाणी घाण झालंय.”
तिचा नवरा ३८ वर्षीय सत्यजीत मोंडल गवंडी काम करतो आणि कोविड-१९ मुळे लादलेल्या टाळेबंदीत त्याच्या हाताचं काम गेलं. कमाई बंद झाल्यातच जमा आहे आणि आता आपली १४ वर्षांची मुलगी आणि कृश आई यांना खाऊ काय घालायचं असा प्रश्न सोमापुढे आ वासून उभा आहे. ज्या चार घरांमध्ये ती स्वयंपाकाचं काम करते, त्यातल्या दोन कुटुंबांनी तिला टाळेबंदीच्या काळातही पगार दिलेला आहे.
शहीद स्मृती कॉलनीत उन्मळून पडलेली झाडं पाहून बैद्य म्हणतात, “या सगळ्याला आपणच दोषी आहोत. शहरात कुठेही मातीच शिल्लक राहिलेली नाही. सगळीकडे नुसतं काँक्रीट. मुळं जगणार तरी कशी?”

२० मे रोजी आलेल्या अम्फान वादळात शहरातली सुमारे ५,००० झाडं उन्मळून इतस्ततः फेकली गेली असा कोलकाता महानगरपालिकेचा अंदाज आहे.

बनमाली नासकार मार्ग, बेहाला, कोलकाताः काही भागांमध्ये अजूनही वीज आलेली नाही पण शहराला वीज पुरवठा करणारं कलकत्ता वीज वितरण महामंडळ वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी अखंड काम करतंय.

पर्णश्री पल्ली, बेहाला, वॉर्ड क्र. १३१: ‘जेव्हा ही मोठाली झाडं उन्मळून, तुटून पडलेली पाहतो ना तेव्हा असं वाटतं जसं काही पोटची लेकरंच गेली आहेत,

प्रिन्सेप घाटाजवळ रेल्वे कर्मचारी पडलेली झाडं बाजूला करतायत आणि वीज पुरवठा सुरळित करतायत.

भारतातल्या सगळ्यात मोठ्या पुस्तकांची बाजारपेठेपैकी एक म्हणजे कॉलेज स्ट्रीटवरचा सुमारे १.५ किलोमीटरचा परिसर, इथल्या पुस्तकांनी खचाखच भरलेल्या दुकानांमागच्या भिंतीदेखील पुस्तकांनीच सजलेल्या असतात. आता त्या भिंती ओक्याबोक्या झाल्या आहेत – आणि बरीच पडझड झाली आहे. वर्तमानपत्राच्या बातम्यांनुसार सुमारे ५० ते ६० लाखांची पुस्तकं खराब झाली आहेत. दुसऱ्या दिवशी रस्त्यातल्या पाण्यात हजारो पुस्तकं आणि पुस्तकांची पानं तरंगत होती.

कोलकात्याच्या सेंट्रल ॲ व्हेन्यू भागातील धर्मतलामधल्या सुप्रसिद्ध के. सी. दास रसगुल्ला दुकानासमोर वादळामुळे झाडं मोडून पडलीयेत

कोलकात्याच्या कुडघाट परिसरातून रिक्षा ओढणारे राजू मोंडल मोडलेल्या झाडांच्या फांद्या घेऊन येतायत.

इथली आणि इतर ठिकाणच्या छोट्या छोट्या टपऱ्या, पत्र्याची खोपटं देखील उखडून पडलीयेत. किती घरं पडली त्याची तर गणतीच नाही. फोनचा संपर्क तुटला आणि विजेचे खांबही पाणी साचलेल्या रस्त्यांवर उखडून पडले.

सदर्न ॲ व्हेन्यूः 'ही काही फक्त झाडं नाहीयेत. किती तरी पक्षी आणि फुलपाखरांसाठी निवारा आहेत ही झाडं. उन्हापासून सावली देतात, पावसापासून छप्पर.'

राशबेहारी ॲ व्हेन्यूः अम्फानमुळे किती नुकसान झालंय याचा आता अंदाज बांधणंही अशक्य आहे.

हुगळीच्या किनाऱ्यावर असलेल्या हॅस्टिंग्समध्ये वादळाने उद्ध्वस्त केलेल्या या शहराच्या क्षितिजावर सूर्य अखेर कलतो
अनुवादः मेधा काळे