कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील अनंजीहुंडी गावातील जेनु कुरुबा आदिवासी असणाऱ्या जयाम्मा बेल्लिया, ३५, हिने बनवलेला पुढील छायाचित्रबंध जंगलातील जीवन दर्शवतो. इथे माणसे आणि प्राणी सोबत राहतात; एकमेकांना मारू शकतात किंवा मरूही शकतात. सहा महिन्यांच्या काळात, बंदीपूर राष्ट्रीय उद्यान या महत्त्वाच्या व्याघ्र अभयारण्यातील आपल्या रोजच्या दिनचर्येतील छायाचित्रे तिने काढली. कॅमेरा वापरण्याची (Fujifilm FinePix S8630) ही तिची पहिलीच वेळ होती. वन्यजीवांसोबत जगण्याविषयी केलेल्या एका मोठ्या सांघिक छायाचित्र प्रकल्पाचा भाग असलेला हा तिचा चित्रबंध एकूण सहा चित्रबंधांच्या मालिकेतील एक आहे.

या तिच्या चित्रबंधातून मानव व प्राणी यांच्या नात्यातले सहसा समोर न येणारे लिंगसापेक्ष सहसंबंध स्पष्ट जाणवतात. वन्यजीवनाचे संरक्षण करण्यासाठीचे सल्ले ग्रामीण गरिबांच्या जीवनातील सामाजिक-आर्थिक वास्तवांकडे दुर्लक्ष करतात; या सल्ल्यांबद्दल हा चित्रबंध स्पष्टपणे प्रश्न उभे करतो. या फोटोशिवायही जयाम्माने पक्ष्यांचे अनेक सुंदर फोटो काढलेले आहेत. “मी एवढे सुंदर फोटो काढायला शिकले याचं माझ्या घरातल्यांना आश्चर्य वाटलं,” जयाम्मा कन्नडमध्ये सांगते.

खंदकाजवळील गायी: या गावठी गायी (स्थानिक वाणाच्या गायी, या फक्त शेणासाठी पाळतात) आमच्या कुटुंबाच्या आहेत. माझी बहीण आणि वहिनी त्यांना शेतात चरायला नेत आहेत. आमच्या गावात पोचण्यासाठी आम्हाला (बंडीपूरचं) जंगल ओलांडावं लागतं. दोन वर्षांपूर्वी, जंगलात बिबट्याने आमचं एक वासरू खाल्लं होतं.

घरी परतणाऱ्या मेंढ्या : “इथे, माझ्या बहिणी आमच्या मेंढ्या घराकडे नेतायत. माझी बहीण तिने गोळा केलेलं जळणही नेत आहे. आमच्यापैकी काहींना सरकारकडून मोफत एलपीजी, स्वयंपाकाचा गॅस मिळाला पण इतरांनी तो घेतला नाही. त्यांना वाटलं, त्यांना त्यासाठी पैसे भरावे लागतील, म्हणून त्यांनी नाही घेतला गॅस.”

बाया आणि शेळ्या: “या शेळ्याही आमच्याच आहेत. माझा भाऊ, बहीण आणि वहिनी त्यांची काळजी घेतात. आमच्याकडे अंदाजे ५० बकऱ्या आहेत आणि त्या जंगलात चरायला जातात. अंधार पडायच्या आतच आम्ही त्यांना परत आणतो नाहीतर जंगली जनावरं झडप घालण्याची शक्यता असते. पुरेशी कमाई झाली नसेल किंवा काही तरी झालं असलं तर आम्ही यातील एखाद-दुसरी शेळी विकू.”

वाघाच्या पावलांचे ठसे: “सकाळी (आसपासच्या घरांत) कामाला जाताना मला हे ठसे दिसले. इथे जवळपास अनेक वाघ आहेत, ते आमच्या गायी आणि शेळ्या मारतात. ते येत-जात असतात. लोक म्हणतात की आता बिबट्यांपेक्षा वाघ अधिक आहेत.”

दोन मुली: “ शाळेत जाण्यासाठी माझ्या भाच्यांना जंगलातून जावं लागतं, आमच्या गावाहून त्या रोज ३ किमी चालत जातात. माझ्या मोठ्या भाचीनं आठवी यत्ता पास केलीये पण इथे पुढची शाळा नाही त्यामुळे तिला १० किमी दूरच्या शाळेत जावं लागेल. एक तर ती वसतीगृहात राहील किंवा रोज जाणं-येणं करील. आता ती जाणार आहे त्यामुळे तिच्या धाकट्या बहिणीला एकटंच शाळेला जावं लागतं. जंगली प्राण्यांमुळे ती घाबरते, मग ती कधी कधी शाळेला बुट्टी मारते. काय माहित ती शाळा सोडूनही देईल. आमच्या गावातील सात-आठ मुलं शाळेत गेली पण बहुतेकांनी शाळा सोडली. माझ्या भाच्याच इथपर्यंत पोचल्यात.”

बिबट्याचं झाड: “ही जंगलातून जाणारी ‘कालुदारी’ (पायवाट) आहे. मी रोज याच वाटेने कामाला जाते आणि माझ्या भाच्या माझ्यासोबत सकाळी शाळेला जातात. तीन महिन्यांपूर्वी, एक म्हातारी आपल्या बकऱ्या चारण्यासाठी सकाळी रानात गेली. नंतर, मी जेव्हा कामावरून परतत होते तेव्हां मी या झाडापाशी लोक गोळा झालेले पहिले. तिच्या बकऱ्या कधीच सुखरूप घरी पोचल्या होत्या. पण ती परतली नाही तेव्हां लोक तिला शोधायला निघाले आणि त्यांना या झाडापाशी ती सापडली. त्या प्राण्याने हिला खाल्लेलं नव्हतं, फक्त कपाळावर दोन चावे घेतलेले होते. ते वाघाचं काम होतं की बिबट्याचं, माहीत नाही. तिला इस्पितळात नेलं पण दुसऱ्या दिवशी ती वारली. ती माझी मावशी होती. मी रोज याच वाटेवरून जाते. आम्हाला इथून जायची भीती वाटते पण काय करणार, घाबरून घरी बसणं तर शक्य नाही. मुलांसाठी बसची सोय करावी असा अर्ज आम्ही सगळ्यांच्या सह्यांनी पाठवला पण काही उपयोग झाला नाही.”

बिबट्या: “ मी जिथे काम करते त्या जागेमागील टेकडीच्या उतारावरील एका खडकावर हा बिबट्या बसलेला होता. मी संध्याकाळी कामावरून घराकडे परतत होते तेव्हां मला तो दिसला. तो खूपच जवळ होता, जेमतेम ४-५ मीटरवर. माझा नवरा मला घ्यायला आलेला होता त्यामुळे मी फारशी घाबरले नव्हते. बिबट्या जर जवळ आला तर तुम्ही फार काही करू शकत नाही. मला बिबट्याचा एक फोटो हवाच होता म्हणून मी हा घेतला. माझा नवरा सोबत नसता तरी मी फोटो घेतलाच असता. मला वाघ, बिबटे यांची भीती वाटते. मी फोटो काढला तेव्हा त्यांने आम्हाला पाहिलं आणि हळूच खडकामागे डोकं वाकवलं.

मचाण : लोक जेव्हां शेतात भुईमुग, नाचणी आणि वाल पापडी लावतात तेव्हां ते संध्याकाळी सातला रानात पोचतात आणि सकाळी सहापर्यंत थांबतात. झाडावर चढून रात्रभर ते राखण करतात, डोळ्याला डोळा न लागू देता. हत्ती आणि रानडुकरं यांच्यापासून ते पिकं राखण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा प्राणी येतात तेव्हां ते फटके फोडतात. पण कधी कधी ते काहीच करू शकत नाहीत. पार सुगीपर्यंत, सहा महिने असं करावं लागतं नाहीतर सारंच हातचं जायचं.

मृत गिधाड: “या गिधाडाला विजेतून प्रवाह जातोय हे माहीत नव्हतं आणि त्यामुळे ते तारेवर बसल्यावर मेलं. हे घडलं पाऊस पडल्यानंतर. या प्राण्यांना काय कल्पना असणार तारेतून विजेचा प्रवाह जातोय याची? ते खालच्या घाणेरीच्या कुंपणावर पडलं. पूर्वी या भागात पुष्कळ गिधाडे होती पण आता त्यांची संख्या कमी झालेली आहे. पूर्वी इथे घाणेरीही फार नव्हती पण गेल्या १० वर्षांत ती फार वाढली आहे आणि कुणाला समजलंही नाही ती कशी वाढली. तिचा फारसा उपयोग नाही पण तिच्या फांद्यांपासून खुर्च्या बनवता येतात. आता तर गवताच्या जागी ती जंगलातही वाढते आणि गवत मात्र कमी होऊ लागलंय. त्यामुळे गुरांचा आणि शेळ्यांचा चारा कमी झालाय.
कर्नाटकाच्या मंगला गावातील मरिअम्मा चॅरिटेबल ट्रस्टच्या समन्वयातून जॅरेड मार्ग्युलिस यांनी हा उपक्रम घडवून आणला आहे. फुलब्राइट नेहरू स्टूडंट रिसर्च ग्रांट (२०१५-१६), बाल्टिमोर काउंटी येथील मेरीलँड विद्यापीठाची ग्रॅज्युएट असोसिएशन रिसर्च ग्रांट आणि मरिअम्मा चॅरिटेंबल ट्रस्टने केलेल्या सहकार्यामुळे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या छायाचित्रकारांचा सहभाग, उत्साह आणि कष्टांमुळे हे शक्य झालं. बी. आर. राजीव यांनी मजकुराचा अनुवाद करून केलेली मदत अनमोल आहे. सर्व फोटोंचे स्वामित्व हक्क पारीच्या क्रिएटिव्ह कॉमन्स धोरणानुसार केवळ छायाचित्रकारांकडेच आहेत. त्यांचा वापर किंवा पुनःप्रकाशन यासाठी पारीशी संपर्क साधावा.
संबंधित कहाण्याः
https://ruralindiaonline.org/articles/we-have-hills-and-forests-and-we-live-here/
‘We have hills and forests and we live here’
https://ruralindiaonline.org/articles/we-have-hills-and-forests-and-we-live-here/
Home with the harvest in Bandipur
Close encounters with the Prince of Bandipur
'That is where the leopard and tiger attack'
'This calf went missing after I took this photo'
अनुवादः छाया देव