“हे असं थोडं थोडं करून मारण्यापेक्षा देवाने एकदाच काय तो आमचा जीव घ्यावा,” अझहर खान म्हणतात. २६ मे रोजी आलेल्या भरतीच्या लाटांनी मौसुनी बेट वेढून टाकलं आणि त्यात त्यांचं घर वाहून गेलं.
त्या दिवशी दुपारी भरती होती, बंगालच्या उपसागरात वादळ तयार झालं आणि त्याचा परिणाम म्हणून मुड़ी गंगा नदीमध्ये उंचच उंच, नेहमीपेक्षा १-२ मीटरने उंच लाटा तयार व्हायला लागल्या. पाण्याला उधाण आलं आणि किनाऱ्यांवरचे बांध फोडून पाणी या सखल भागातल्या बेटामध्ये शिरलं, वाटेतली घरं आणि शेतं पोटात घेत.
नैऋत्य मौसुनीपासून सुमारे ६५ सागरी मैलांवर ओडिशाच्या बालासोरमध्ये यास चक्रीवादळ धडकलं तेव्हाच, २६ तारखेच्या दुपारी हे वादळ तयार झालं होतं. यास हे अतितीव्र चक्रीवादळ होतं आणि वाऱ्याचा वेग ताशी १३०-१४० किलोमीटर इतका होता.
“आम्ही वादळ येताना पाहत होतो पण आम्हाला वाटलं की आम्ही वेळेत सगळा पसारा हलवू शकू. पण तितक्यात पाणी गावात घुसलं,” बाघडांगा मौझा (गाव) इथल्या माजुरा बीबी सांगतात. त्या मौसुनीच्या पश्चिमेला मुड़ी गंगा नदीच्या बांधालगत राहतात. “आम्ही जीव वाचवायला पळालो, पण एकही वस्तू वाचवू शकलो नाही. आमच्यातले कित्येक जण जीव वाचवण्यासाठी झाडांवर चढून बसले होते.”
सुंदरबनच्या चार गावांना – बाघडांगा, बलियारा, कुसुमतला आणि मौसुनी – जाणाऱ्या बोटी आणि लाँच अखंड पावसामुळे तीन दिवसांपूर्वीपासूनच बंद केल्या होत्या. २९ मे रोजी सकाळी मी मौसुनीला पोचलो तेव्हा बराचसा भाग पाण्याखालीच होता.
“आमची जमीन खाऱ्या पाण्याखाली गेलीये,” बागडांगाच्या निवारा शिबिरात भेटलेले अभिलाष सरदार सांगतात. “आम्हा शेतकऱ्यांच्या पोटावरच पाय आलाय,” ते म्हणतात. “आता पुढची तीन वर्षं आमच्य शेतात मला काहीही पीक घेता येणार नाही. आणि परत ती आधीसारखी सुपीक व्हायला सात वर्षं तरी लागतील.”

वादळ आलं आणि बाघडांगातल्या गायेन कुटुंबाचं घर वाहून गेलं. “आमचं घर मोडून पडलंय, तुम्हाला दिसतच असेल. या सगळ्या गाळातून आमच्या हाती काही देखील लागणार नाहीये”
पश्चिम बंगालच्या नामखाना तालुक्यातलं मौसुनी नद्या आणि समुद्राने वेढलेलं आहे. कायमच नैसर्गिक आपत्तीचा सामना करत असलेल्या या बेटांवर यास वादळानंतर मोठी नासधूस झाली आहे.
एक वर्षापूर्वी – २० मे २०२० रोजी अम्फान चक्रीवादळाचा सुंदरबनला फटका बसला होता. त्या आधी बुलबुल (२०१९) आणि आयला (२००९) या वादळांनी या बेटांचं प्रचंड नुकसान केलं होतं. आयला वादळानंतर मौसुनी बेटावरच्या ३०-३५ टक्के जमिनीचं अपरिमित नुकसान झालं. बेटाच्या दक्षिणेकडचा किनारी भाग जमिनीचा क्षारता वाढल्यामुळे शेती करण्यास लायक राहिलेला नाही.
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की समुद्राचं तापमान तर वाढतंच आहे आणि हे जागतिक तापमान वाढीकडे बोट दाखवतं. पण सोबतच किनारी भागातलं तापमान देखील वाढतंय. आणि याचा एकत्रित परिणाम म्हणून बंगालच्या उपसागरात चक्रीवादळं तीव्र होत चालली आहेत. २००६ साली भारतीय हवामान वेधशाळेने केलेल्या एका अभ्यासानुसार अतितीव्र चक्रीवादळाच्या टप्प्यांनुसार तीव्रता वाढत जाण्याचा दर मे, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात जास्त दिसून येतो आहे.
यास वादळाआधी बेटांवरच्या एकूण ६,००० एकर क्षेत्रापैकी ८० टक्के भूभाग शेतीयोग्य होता, सरल दास सांगतात. त्यांची बाघडांगामध्ये पाच एकर जमीन आहे. “आता फक्त ७०-८० टक्के कोरडी राहिलीये.”
बेटांवरच्या २२,००० लोकांपैकी (जनगणना, २०११) जवळपास प्रत्येकालाच वादळाचा फटका बसलाय, दास सांगतात. ते बाघडांगाच्या को-ऑपरेटिव्ह स्कूलमध्ये काम करतात. “बेटावरची तब्बल ४०० घरं पूर्ण मोडून पडलीयेत आणि २,००० घरांची पडझड झालीये.” बहुतेक सारं पशुधन आणि कोंबड्या आणि मासे नष्ट झालेत, ते सांगतात.

पाणी भरलेल्या भातखाचरांतून पाण्याचा ड्रम ओढत नेणारा बाघडांगाचा एक रहिवासी
वादळानंतर पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या कूपनलिकांचा वापरच आता करता येत नाहीये. “त्यातल्या अनेक पाण्याखाली गेल्या आहेत. सगळ्यात जवळच्या ट्यूबवेलला पोचायला आम्हाला कंबरेइतक्या गाळातून पाच किलोमीटर चालत जावं लागतं,” जयनाल सरदार म्हणतात.
अशा आपत्ती आता मौसुनीच्या लोकांच्या जगण्याचा भाग झालाय आणि त्यांना त्यासोबतच जगावं लागणार आहे, ज्योतिरिंद्रनारायण लाहिड़ी म्हणतात. सुंदरबन आणि तिथल्या लोकांसंबंधी एक त्रैमासिक निघतं, सुधु सुंदरबन चर्चा. त्याचे ते संपादक आहेत आणि पर्यावरण संवर्धन कार्यकर्ते. “तगून राहण्यासाठी, पुरामध्ये टिकून राहतील अशी घरं बांधण्यासाठी त्यांना नव्या पद्धतींशी जुळवून घ्यावं लागेल.”
आपत्तींची जोखीम असलेल्या मौसुनीसारख्या भागात लोक सरकारी मदतीवर अवलंबून नसतात, लाहिड़ी म्हणतात. “ते सज्ज असतात आणि म्हणून ते तगून राहतात.”
पश्चिम बंगाल शासनाच्या अंदाजानुसार किमान ९६,६५० हेक्टर (२,३८,८३० एकर) क्षेत्रावरची उभी पिकं पुराच्या पाण्याखाली गेली आहेत. मौसुनीमध्ये लोकांची मुख्य उपजीविका शेती आहे आणि आता सुपीक जमीन खाऱ्या पाण्याखाली गेल्यावर गोष्टी जास्तच गंभीर बनत चालल्या आहेत.
यास चक्रीवादळाने केलेल्या विध्वंसाचा धक्का अजून विरलाही नाहीये आणि भारतीय हवामान वेधशाळेने ११ जून रोजी बंगालच्या उपसागरात वादळ येण्याची शक्यता वर्तवली आहे. सुंदरबनमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
बाघगडांगामध्ये, बीबीजान बीबींना मात्र दुसरीच चिंता सतावतीये. “पाणी ओसरल्यावर गोखरा (नाग) घरात यायला लागतील. आम्हाला त्याचीच भीती आहे.”

निरंजन मंडल घरच्यांसाठी ट्यूबवेलमधून पाणी घेऊन गाळातून चालत चाललेत

“माझी मुलगी मौसुनीत राहते. गेल्या दोन दिवसांपासून तिच्याशी फोनवर संपर्कच होऊ शकत नाहीये,” नामखानाच्या प्रतिमा मंडल सांगतात. त्यांच्या मुलीचं घर पाण्यात गेलंय याची त्यांना खात्री आहे. “मीच जाऊन बघून येणारे”

मौसुनी बेटांवर पोचण्यासाठी फेरी आणि बोटींनीच जावं लागतं. यास चक्रीवादळ येण्याआधी नामखानापासून या सेवा बंद करण्यात आल्या होत्या. २९ मे रोजी फेरी बोटी सुरू झाल्या आणि बेटावरच्या लोकांनी सुटकेचा निःश्वास सोडला

पुराचा फटका बसलेल्या मौसुनीतलं एक कुटुंब आपली गाई-गुरं बाघडांगाला सुरक्षित स्थळी हलवतंय

मौसुनीच्या सखल भागातल्या अनेक कुटुंबांना सगळा संसार घेऊन घरं सोडून जावं ल ागतं य

पाणी आमच्या घरात घुसलं असं बाघडांगाच्या या ताई सांगतात. त्यांच्या घरातली एकही वस्तू त्या वाचवू शकल्या नाहीत

आपल्या पक्ष्याबद्दल ही लहान मुलगी म्हणते, “बरंय मी तिला वाचवू शकले. ती माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहे”

बाघडांगाच्या काही बाया निवारा शिबिरात, पूर ओसरण्याची वाट पाहतायत

गावातल्या प्राथमिक शाळेत सुरू केलेल्या कोविड केंद्रामध्ये देखील पाणी भरलं

मसूद अली यांची अख्ख्या वर्षाची बचत पुरात वाहून गेली. “अख्खी भातं, १२०० किलो पाण्यामुळे वाया गेली,” ते म्हणतात. “खाऱ्या पाण्याचा स्पर्श झाला की तांदूळ खाण्यालायक राहत नाही. सगळे ४० कट्टे मला फेकून द्यावे लागणार आहेत”

इम्रान मोडून पडलेल्या विटांचा एक ब्लॉक उंचावर नेण्याचा प्रयत्न करतायत. भरतीच्या लाटांनी मुड़ीगंगा नदीवरचा बांध फोडला आणि पाणी आत भूभागात घुसलं

बांधाशेजारी राहणाऱ्या माजुरा बीबींचं घर लाटांच्या तडाख्यात पूर्ण ढासळलं. “पाणी आत घुसलं तेव्हा आम्ही बाहेर पळालो. घरातून एक पैसा किंवा कागद देखील सोबत नेता आला नाही.” त्या आता एका तंबूत राहतायत

बांधाजवळच राहणाऱ्या रुक्सानाची शाळेची पुस्तकं पुरात वाहून गेली

हे बाळ पुरात जवळ जवळ वाहून गेलं होतं. “माझा जावई झाडावर चढला आणि त्याने त्याचा जीव वाचवला,” बाळाची आजी प्रोमिता सांगते. “तो फक्त आठ महिन्यांचा आहे पण त्याच्याकडे अंगावर घालायला एक कपडा शिल्लक नाहीये”

पुराच्या तडाख्यातून वाचलेली कागदपत्रं, पुस्तकं आणि फोटो उन्हात सुकायला ठेवले आहेत

इयत्ता आठवीत शिकणाऱ्या जहाँआराची सगळी पुस्तकं आणि कागदपत्रं २६ मे रोजी पाण्यात वाहून गेली

गंगेची उपनदी असलेल्या मुड़ी गंगा नदीवरचा हा बांध फोडून पाणी आत शिरलं. मौसुनी बेटांच्या दक्षिणेकडच्या टोकाजवळच ही नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते
अनुवादः मेधा काळे