“अच्छा, तुम्ही कोलकात्याचे?” त्याने माझ्याकडे पाहिलं आणि त्याचे डोळे चमकले. “मी कोलकाता आणि हावड्याला पण आलोय. किती तरी वेळा. आणि नेहमी कामाच्याच शोधात. कधी नशीब निघायचं, कधी नाही. शेवटी, इथे येऊन पोचलोय.”
‘इथे’ म्हणजे समुद्रसपाटीपासून १०,००० फूट उंचावर, लडाखमध्ये. झारखंडमधल्या आपल्या घरापासून २,५०० किलोमीटरवर राजू मुरमू आपल्या परिचयाच्या गजबजलेल्या शहराच्या आठवणींची ऊब आपल्या सभोवताली पांघरून घेतो. हिमालयाच्या या वाळवंटात त्याच्या तंबूबाहेरचं पारा संध्याकाळ होताच झपाट्याने खाली उतरायला लागतो. वीज नसल्याने राजू आणि त्याच्या सोबतचे स्थलांतरित कामगार राहतात त्या तंबूंभोवती थोड्या वेळातच अंधार भरून जाईल.
३१ वर्षीय राजू झारखंडच्या दुमका जिल्ह्यातल्या बाबूपूरचा रहिवासी आहे. तो आणि त्याच्यासारखे इतर कामगार भारतातले सर्वात उंचावरचे रस्ते बांधण्यासाठी लडाखला नियमित येतायत. “हे माझं चौथं वर्ष आहे. मी गेल्या वर्षीसुद्धा आलो होतो. काय करणार? आमच्या गावात काही कामच नाहीये,” तो सांगतो. रस्त्याचं काम सुरू आहे तिथपासून एक-दोन किलोमीटरवर राजू आणि झारखंडचेच इतर नऊ जण तंबू ठोकून राहतायत. ते समुद्रसपाटीपासून १७,५८२ फूट उंचावर असलेल्या खारदुंग ला (खारदोंग गावाजवळ) आणि १०,००० फूटावरच्या नुब्रा व्हॅलीदरम्यान खिंडीतल्या रस्त्याचं काम करतायत.
लडाखचा दुर्गम आणि विराण परिसर सीमापार होत असलेला व्यापर, धार्मिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीमुळे पूर्वापारपासून फार महत्त्वाचा राहिला आहे. सध्या मात्र झारखंड, छत्तीसगड, बिहार, मध्य प्रदेश आणि इतर राज्यांतल्या स्थलांतरित कामगारांची वर्दळ इथे वाढायला लागली आहे. लडाखला नवीन प्रशासकीय ओळख मिळाल्यामुळे काही खाजगी विकसक इथे या परिसरात आता हातपाय पसरू लागले आहेत. या केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनाने सीमा रस्तेबांधणी संस्थेच्या सहकार्याने वाणिज्यिक आणि सैनिकी महत्त्व असणाऱ्या प्रदेशातल्या पायाभूत सेवा-सुविधा प्रकल्पांना गती दिली आहे. आणि त्यामुळेच लडाखमध्ये स्थलांतरित कामगारांची येजा मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
रस्त्याच्या कडेला, कधी कधी आपल्या कुटुंबांसोबत, किंवा अगदी ११ फूट बाय ८.५ फुटी तंबूंमध्ये तुम्हाला हे कामगार पहायला मिळतील. रस्त्याचं काम जसजसं पुढे जातं, तसं हे तंबू देखील आपला तळ हलवत जातात. प्रत्येक तंबूत भांडी-कुंडी, पिशव्या खचाखच भरलेल्या दिसतात. एका तंबूत साधारणपणे १० जण राहतात. थंड जमिनीवर रग पसरून निजतात. विजेशिवाय, कडाक्याच्या थंडीचा मुकाबला करत आणि पुरेशा संरक्षक साहित्याशिवाय शून्याच्या खाली पारा गेल्यानंतरही काकडत काम करतात.

खारदुंग ला पासपाशी एक मजूर दगड उचलून नेताना. इथलं खडतर, निर्दय म्हणावं असं वातावरण, पायाभूत सुविधा उभारणीत येणारा प्रचंड खर्च आणि चांगल्या दर्जाच्या अवजारांची वानवा यामुळे कामगार स्वतःची श्रमशक्ती वापरून रस्ते बांधतात, परत परत बांधत, दुरुस्त करत राहतात
“मी पाच सहा महिन्यांत परत जाईन. तेवढ्या काळात मी कसेबसे २२,००० ते २५,००० रुपये मागे टाकू शकतो. सहा जणांच्या कुटुंबासाठी ते कितपत पुरणार,” दुमकातून आलेले चाळिशी पार केलेले अमीन मुरमू विचारतात. त्यांच्यासारख्या कामगारांना दिवसाला ४५० ते ७०० रुपये मजुरी मिळते, अर्थात कामानुसार त्यात फरक पडतो. खारदुंग लाच्या नॉर्थ पुल्लूमधल्या त्यांच्या मुक्कामावर ते माझ्याशी बोलत होते, अमीन मुरमूंना दोन मुलं आहेत. थोरला १४ वर्षांचा आणि धाकटा १० वर्षांचा. या महासाथीमुळे त्यांचं शिक्षण ठप्प झालंय याचं त्यांना वाईट वाटतंय. शाळा ऑनलाइन झाल्या पण त्यांच्यासाठी स्मार्टफोन घेण्याइतके पैसे काही मुरमूंकडे नव्हते. “आमच्या भागात बहुतेक कुणालाच फोन परवडणारे नाहीत. माझ्या थोरल्याने अभ्यास करणंच बंद केलंय. थोडे अधिकचे पैसे जमा करता आले तर धाकट्यासाठी एक फोन घ्यायचा विचार आहे. पण दर महिन्याला इंटरनेटचा खर्च कसा करायचा?” ते विचारतात.
अमीन यांच्या तंबू शेजारीच काही कामगार पत्ते खेळत बसले होते, तेवढ्यात मी तिथे पोचलो. “सर, या की. आज रविवार आहे – सुट्टीचा वार,” ३२ वर्षींचा हमीद अन्सारी सांगतो. तोही झारखंडहून आलाय. हा गट एकदम मोकळा ढाकळा आणि गप्पिष्ट वाटतो. त्यांच्यातला एक जण म्हणतोः “तुम्ही स्वतःच कोलकात्याचे आहात. तुम्हाला तर माहितीये की कोविडमुळे झारखंडमध्ये किती बरबादी झालीये. किती तरी लोक गेले, कित्येकांची कामं सुटली. मागचं वर्ष आम्ही कसं तरी करून भागवलं. या वर्षी [२०२१] मात्र आम्ही वेळ न दवडता इथे आलोय.”
“मी १९९० च्या सुरुवातीपासून बांधकामावर कामगार म्हणून लडाखला येतोय. पण मागचं वर्षं सगळ्यात जास्त भयंकर होतं,” घनी मिया सांगतात. पन्नाशीचे मिया झारखंडच्याच या गटातले एक. २०२० च्या जून महिन्यात पहिल्यांदा जरा निर्बंध शिथिल झाले तेव्हा ते इथे आले. “इथे आल्यावर दोन आठवड्यांसाठी आम्हाला विलगीकरण केंद्रात पाठवलं होतं. तिथे १५ दिवस राहिल्यानंतर आम्हाला कामावर जाता आलं. पण ते दोन आठवडे आमच्यासाठी फार फार भयंकर होते, मानसिकदृष्ट्या फारच वाईट.”
लेहला परत येत असताना मला झारखंडचाच एक तरुण कामगारांचा गट भेटला. “आम्ही इथे स्वैपाकी म्हणून आलोय, या कामगारांना जरा हातभार म्हणून,” ते सांगतात. “आम्हाला रोज नक्की किती पैसे मिळतात तेसुद्धा आम्हाला माहित नाहीये. पण [गावात] नुसतं हातावर हात धरून राहण्यापेक्षा इथे येऊन काम केलेलं कधी पण चांगलंय.” त्यांच्यातल्या प्रत्येकाकडे तिथे गावी आपल्या कुटुंबाने कोविडच्या महासाथीचा कसा मुकाबला केलाय याच्या कहाण्या होत्या. त्यातल्या त्यात एकच बरी गोष्ट म्हणजे त्यांना सगळ्यांना कोविडच्या लशीचा पहिला डोस मिळालाय. (See: In Ladakh: a shot in the arm at 11,000 feet)

लेहच्या बाजारपेठेत मजूर एका हॉटोलचं बांधकाम करतायत. लडाख आता केंद्रशासित प्रदेश झाल्याने खाजगी विकसकांसाठी इथे नव्या संधी निर्माण झाल्या आहेत

लेहमध्ये एक मजूर आपल्या प्रचंड कष्टाच्या दिवसातले काही क्षण आराम करतोय

भारत आणि चीनमध्ये सीमेवर तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्यामुळे लडाखमधल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना बळ मिळालं आहे. झारखंड, छत्तीसगड, बिहार आणि इतर राज्यांतले अनेक मजूर इथे कामासाठी येत आहेत

लडाखमध्ये तापमान एकदम विषम आणि तीव्र असतं. दिवसा पारा इतका चढतो की तापमान आणि उंचीमुळे रस्तेबांधणीकचं काम या कामगारांसाठी आणखीच खडतर होतं

खारदुंग लाच्या साउथ पुल्लूमध्ये झारखंडच्या काही मजुरांचा एक गट रस्ता बांधायचं काम करतोय

सीमा सडक संघटनेचा एक कर्मचारी उखडलेला रस्ता साफ करतोय

बिघडलेला एक रोड-रोलर तिथेच उभा आहे. हा प्रदेश इतका खडतर आहे की वाहनं आणि उपकरणं सारखीच नादुरुस्त होत असतात

“मी इथे एका खाजगी कंपनीसाठी काम करतोय, त्यांचा या भागात बराच विस्तार सुरू आहे,” झारखंडचा एक मजूर सांगतो

वीज नसलेले, पुरेशा गाद्या, अंथरुणं नसलेले हे दाटीवाटीचे तंबूच सहा महिन्यांच्या कंत्राटी कामगारांचं ‘घर’ म्हणायचे

झारखंडच्या दुमका जिल्ह्यातले अमीन मुरमू रविवारी दुपारी आपल्या जेवणाच्या सुट्टीत. महासाथीमुळे त्यांच्या मुलांचं (वय वर्षं १४ आणि १०) शिक्षण ठप्प झालंय याचा त्यांना खेद वाटतो. गावी असलेल्या मुलांसाठी फोन खरेदी करण्याइतके पैसे त्यांच्यापाशी नाहीत त्यामुळे मुलं ऑनलाइन शाळा शिकू शकत नाहीयेत

कामात काही क्षणांचा विरंगुळा – एक कामगार आपल्या मोबाइलवर सिनेमा पाहतोय

खारदुंग लाच्या नॉर्थ पुल्लूमध्ये एका तंबूत काही कामगार पत्ते खेळतायत. पन्नाशी पार केलेले, झारखंडच्या दुमका जिल्ह्याचे घनी मिया १९९० पासून लडाखला येतायत

“आमची रोजची मजुरी किती तेदेखील आम्हाला माहित नाहीये. आम्ही इथे कामगारांसाठी खाणं बनवायला आलोय,” हे काही कामगार सांगतात

एका मोडक्या तंबूचा तात्पुरता संडास केलाय – वाहतं पाणी नाही ना गटाराची काही सोय

खारदुंग ला पास जवळ एका छोट्याशा खानावळीत झारखंडचे काही हंगामी स्थलांतरित कामगार काम करतायत. १७,५८२ फूट उंचीवरचं खारदुंग ला ते १०,००० फुटावरचं नुब्रा व्हॅली दरम्यान रस्त्याचं काम करतायत. पर्यटनाचा हंगाम सुरू झाला की त्यांच्यापैकी बरेच जण रस्त्याच्या कडेच्या धाब्यांवर काम करतात. रविवारचा सुट्टीचा दिवस असा सत्कारणी लावतात – तेवढेच चार पैसे हाती येतात

८-१० कामगार राहू शकतील अशा या छोट्याशा खोपटात कामगारांचे कपडे आणि इतर सामानसुमान

निम्मो परिसरात काम करणारे झारखंडचे स्थलांतिरत कामगारः “गावात हातावर हात धरून बसण्यापेक्षा इथे येऊन काम करणं चांगलं”

चुमाथांग भागात गारठ्यात हा कामगार एकटाच काम करतोय

पूर्व लडाखच्या हानले गावात झारखंडचे हे स्थलांतिरत कामगार उच्च दाब वीज वाहिनी दुरूस्त करतायत. कोणत्याही संरक्षक साहित्याशिवाय

हानले गावात कामगारांचे कपडे आणि अंथरुणं उन्हात उभ्या एका स्कूटरवर वाळत टाकलीयेत