धनुष्कोडी ही एकाकी, कुणाच्या ध्यानीमनी नसलेली एक जागा आहे – दुर्गम जागा, सगळीकडे पांढरी शुभ्र रेती, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागराच्या सीमेवरचं तमिळ नाडूतलं भारताचं दक्षिणेकडचं टोक. १९१४ च्या सुमारास इंग्रजांनी एक छोटं बंदर म्हणून या गावाचा विकास केला आणि हळू हळू भाविक, पर्यटक, मच्छिमार, व्यापारी आणि इतरांच्या येण्या-जाण्याने हे गाव गजबजून गेलं.
पाच दशकानंतर, १९६४ मध्ये, २२ डिसेंबरच्या मध्यरात्री एक प्रचंड मोठं चक्रीवादळ इथे येऊन थडकलं आणि २५ डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंत रामनाथपुरम जिल्ह्यातल्या रामेश्वरम तालुक्यातल्या या गावात धूळधाण करून गेलं. या चक्रीवादळामुळे उठलेल्या समुद्राच्या महाकाय लाटांनी हे गाव जमीनदोस्त केलं आणि किमान १८०० लोक मारले गेले. तीस किलोमीटरच्या पांबमहून १०० प्रवाशांना घेऊन येणारी आगगाडी पाण्याखाली गेलेली होती.
वादळानंतर या जागेला, ‘भुताचं गाव’, ‘राहण्यास अयोग्य’ अशी बिरुदं चिकटली आणि त्यामुळे या गावाकडे सगळ्यांचं पूर्ण दुर्लक्ष झालं. मात्र आजही धनुष्कोडीमध्ये राहणाऱ्या (स्थानिक पंचायतीच्या अंदाजानुसार) तब्बल ४०० मच्छिमार कुटुंबांसाठी ही ओसाड जागाच त्यांचं घर आहे. चक्रीवादळातून बचावलेले काही जण इथे गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ वीज, पाणी, संडास किंवा अगदी पिण्याच्या पाण्याशिवाय राहतायत.

चक्रीवादळामध्ये संपूर्ण आगगाडी पाण्याखाली गेली होती, रस्त्याच्या कडेने धावणारी रुळपट्टी गंजून गेलीये आणि आता पर्यटकांचं आकर्षण ठरतीये

धनुष्कोडी रामेश्वरमपासून २० किमीवर आहे. समुद्र किनाऱ्यालगतच्या या पाणथळ भागात वाहतूक करणाऱ्या व्हॅननी पर्यटक इथे येतात. आता इथे चांगले रस्ते बांधून दळणवळण सुधारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे जेणेकरून इथे जास्त प्रवासी येतील.

इथे न्हाणी आणि संडास म्हणजे नारळाच्या झापा लावून तयार केलेली तात्पुरती सोय आहे. लोक झुडपांच्या मागे किंवा वाळूत शौचाला जातात, कीटक, सरपटणारे प्राणी आणि समुद्राच्या लाटांबरोबर वाहून आलेल्या धारदार प्रवाळाची सतत भीती असते. कलियारासी मला सांगतात की दर आठवड्यात त्या आणि इतर बाया नुसत्या हातांनी ३-४ फूट खोल (याहून जास्त खोल गेलं तर खारं पाणी झिरपतं) छोट्या विहिरी खणतात, पिण्यासाठी आणि इतर घरगुती वापरासाठी पाणी शोधण्याचा हा त्यांचा प्रयत्न.

स्वच्छतेच्या कोणत्याच सोयी नसल्यामुळे बायांना उघड्यावर, रस्त्याच्या कडेला आंघोळ करावी लागते. “आम्हाला टाकून दिलंय, कुणीही येऊन आम्ही कसं जगतोय हे विचारत नाही,” त्या म्हणतात.

७८ वर्षीय सय्यद यांचे पती वादळात मरण पावले. त्यांना सरकारकडून कसलीही मदत मिळाली नाही, पण तरीही त्या आज इथे वास्तव्य करत आहेत. त्यांनी एकेक वीट रचत त्यांचं घर आणि चहाचं दुकान बांधलं आणि इथले भग्नावशेष – यात एक चर्च आणि उखडलेल्या रुळपट्टीचा समावेश आहे – पहायला येणाऱ्या पर्यटकांना चहा देतात. काही काळापूर्वी त्यांना आणि इतर गावकऱ्यांना सरकारकडून कोणताही पुनर्वसनाचा पर्याय न देता घरं सोडण्यासंबधी नोटिस देण्यात आली आहे, सरकारला पर्यटनासाठी धनुष्कोडी विकसित करायचं आहे.

ए. जपियम्मल, वय ३४ कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी सुकट विकते. तिचे पती मच्छिमार आहेत. त्यांनाही घर खाली करण्याची नोटिस मिळाली आहे. इथला मच्छिमार समुदाय वारे, ग्रह तारे आणि लाटांचा अंदाज बांधण्यासाठी पारंपरिक पद्धतींवर अवलंबून आहेत. आता इतक्या दशकांनंतर जपियम्मल आणि इतरांना त्यांची भूमी सोडणं किंवा वेगळीकडे जाऊन मासेमारीच्या नव्या पद्धती शिकणं कठीण आहे.

एम. मुनियास्वामी, वय ५०, गेली ३५ वर्षं या ओसाड जागेत राहतायत. त्यांना गेल्या वर्षी सौर उर्जा जोडणी मिळाल्याचं ते सांगतात. खरं तर केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत ही जोडणी मोफत मिळायला हवी मात्र स्थानिक संस्थेने मात्र त्यांच्याकडून रु. २००० वसूल केले आणि त्यानंतर एका दलालाने त्यांना आणि इतर अनेकांना गंडा घातला. बहुतेक गावकरी आजही सौरदिव्यांच्या प्रतीक्षेत आहेत, तोपर्यंत चिमणीचाच काय तो उजेड ज्याच्यासाठी त्यांना रामेश्वरममधून ६० रु. लिटर दराने रॉकेल विकत घ्यावं लागतं.

श्री लंकेची सीमा इथून केवळ १८ समुद्री मैल (३३ किलोमीटर) दूर आहे आणि श्री लंकेच्या नौदलाचा समुद्रात मोठा वावर असतो. धनुष्कोडीच्या मच्छिमारांना चुकून सीमेलगतच्या भागात गेल्यास पकडले जाण्याची सतत भीती असते. उत्तम जीपीएस उपकरणं आणि प्रशिक्षणाच्या अभावी त्यांना सीमा नक्की कुठे आहे ते शोधणं शक्य नसतं. आणि पकडलं जाणार म्हणजे त्यांच्या नावा आणि माशाची जाळी जप्त होणार, अर्थात त्यांची उपजीविकाच. आणि हे घडतच असतं.

धनुष्कोडीमध्ये एकच सरकारी प्राथमिक शाळा आहे आणि बहुतेक मुलांना इयत्ता पाचवीनंतर शिकायचं असेल तर २० किलोमीटरवरच्या रामेश्वरमला जायला लागतं. बहुतेक वेळा शिक्षण आणि प्रवासावरचा खर्च त्यांच्या पालकांच्या खिशाला परवडणारा नसतो.

थोडी वरकमाई म्हणून स्त्रिया आणि मुलं इथे खेळणी आणि शंखशिंपले विकण्यासाठी छोट्या टपऱ्या थाटतात. मागे सेंट ॲन्थनी चर्चचे भग्नावशेष.

धार्मिक हिंदूंसाठी धनुष्कोडीचं विशेष महत्त्व आहे – असं मानलं जातं की रामाने बांधलेला सेतू इथूनच सुरू होतो. पुराणामध्ये असं म्हटलंय की प्रभू रामचंद्राने रावणाच्या लंकेस पोचण्यासाठी पूल बांधायचा होता त्यासाठी धनुष्याच्या टोकाने या जागेवर खूण केली. यावरूनच या जागेचं नाव पडलं – धनुष्कोडी, धनुष्याचं टोक. राज्य सरकारला आता इथे पर्यचनाचा विकास करायचा आहे आणि त्यांच्या नियोजनानुसार इथे जोन नव्या बोटी सुरू होणार आहेत. इथे दीर्घकाळ वास्तव्य करणाऱ्या स्थानिक मच्छिमारांना मात्र या नव्या नियोजनात स्थान नाही.

हे स्मारक, चक्रीवादळामध्ये जीव गमावलेल्या गावकऱ्यांच्या स्मरणार्थ वर्गणी गोळा करून बांधण्यात आलं.
अनुवादः मेधा काळे