सप्टेंबरच्या सुरुवातीला घोडामाराच्या बंदरावर जिथे फेरीबोटी थांबतात तिथे नुसती लगबग सुरू आहे. गडी, बाया, लहानगे आणि शेरडंसुद्धा बोटीतून उतरून आपापल्या कामाला जायच्या गडबडीत असल्यासारखी दिसतायत. भरतीच्या काळात नातेवाइकांच्या घरी किंवा इतरत्र निवाऱ्यासाठी गेलेले लोक पाणी ओसरल्यावर आपापल्या गावी परत येतायत. काकद्वीप या मुख्य बेटापासून सुंदरबनच्या त्रिभुज प्रदेशात, म्हणजेच डेल्टामध्ये असलेल्या या बेटावर पोचण्यासाठी ४० मिनिटं लागतात. महिन्यातून किमान दोन वेळा फेरी बोट लोकांची अशी ने-आण करते. पश्चिम बंगालच्या साउथ २४ परगणा जिल्ह्यातल्या या छोट्याशा बेटावर राहणाऱ्यांना जगण्यासाठीचा किती संघर्ष करावा लागतोय ते काही या प्रवासातून लक्षात यायचं नाही.
वारंवार येणारी चक्रीवादळं, समुद्राची वाढती पातळी आणि मुसळधार पाऊस अशा वातावरण बदलांच्या निदर्शक असलेल्या या सगळ्या घटनांमुळे घोडामाराच्या लोकांचं जगणं मुश्किल होऊन बसलं आहे. पूर आणि जमिनीची धूप यामुळे त्यांचं हे एकाकी बेट आता जणू हुगळी नदीच्या खाडीमधला एक तरंगता भूभाग बनून गेलं आहे.
मे महिन्यात यास चक्रीवादळ धडकलं तेव्हा सागर तालुक्याच्या घोडामारामध्ये फार मोठा विध्वंस झाला. २६ मे रोजी वादळ आणि भरतीचं पाणी बेटाच्या बंधाऱ्यांवरून आत शिरलं आणि १५-२० मिनटात संपूर्ण बेटावर पाणी भरलं. २०१९ साली बुलबुल आणि २०२० साली अम्फान वादळाचा फटका सहन केलेल्या रहिवाशांना पुन्हा एकदा वादळाचा विध्वंस सहन करावा लागला. घरं कोलमडून पडली, साठवलेली भातं, सुपारीच्या वाड्या आणि सूर्यफुलाची शेतं वाहून गेली.
खासीमारा घाटाजवळ असलेलं अब्दुल रौफ यांचं घर वादळाच्या तांडवामध्ये उद्ध्वस्त झालं. “ते तीन दिवस आमच्याकडे अन्नाचा कण नव्हता. पावसाचं पाणी पिऊन आणि प्लास्टिकच्या कागदांखाली आम्ही दिवस काढले,” रौफ सांगतात. इथून ९० किलोमीटरवर असलेल्या कोलकाता शहरात ते शिवणकाम करतात. ते आणि त्यांची बायको मध्यंतरी आजारी पडले तेव्हा “सगळ्यांना संशय होता की आम्हाला कोविड झालाय,” ते सांगतात. “अनेकांनी गाव सोडून पळ काढला होता,” रौफ म्हणतात. “आम्ही तिथेच अडकून पडलो होतो, सुरक्षित ठिकाणी जाताच आलं नाही.” तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर रौफ आणि त्यांच्या पत्नीला औषधोपचार मिळाले. “तुम्ही काहीही करून काकद्वीपला या असा बीडीओंकडून निरोप आला. तिथून त्यांनी अँब्युलन्सची सोय केली होती. [उपचारांवर] आम्हाला सगळा मिळून २२,००० रुपये खर्च आला.” तेव्हापासून रौफ आणि त्यांचं कुटुंब बेटावरच्या निवारा केंद्रामध्ये मुक्काम करतायत.
ज्यांच्या घरांचं नुकसान झालंय त्यांना तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये हलवण्यात आलंय. मंदिरताला गावाच्या रहिवाशांना मंदिरताला बाजाराजवळच्या टँक ग्राउंडवरच्या निवारा केंद्रात हलवलं आहे. या बेटावरची ही सर्वात उंचावरची जागा आहे. काहींनी जवळच्याच एका गल्लीमध्ये निवासाची सोय केलीये. बेटावरच्या हाथकोला, चुनपुरी आणि खासीमारा भागातल्या ३० कुटुंबांना घोडामाराच्या दक्षिणेला असलेल्या सागर बेटावर तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तिथेच नव्याने घर वसवण्यासाठी त्यांना तिथे जमिनी देखील देण्यात आल्या आहेत.

खासीमाराच्या रेझौल खान यांच्या घराचं यास चक्रीवादळात मोठं नुकसान झालं आहे. आता त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला सागर बेटावर हलवण्यात आलं आहे
रेझौल खान यांचं कुटुंब यातलंच एक. खासीमारामधलं त्यांचं घर आता पुरतं कोलमडून पडलं आहे. “आता मला हे बेट सोडून जावं लागणार आहे, मी का जावं?” ते मला विचारतात. वादळी हवा होती. वादळात पडझड झालेल्या एका मशिदीच्या अंधाऱ्या पोटमाळ्यावर बसून बोलत होतो. “माझा लंगोटीयार गणेश पारुआ इथेच आहे. त्याला सोडून मी कसा जाऊ? काल रात्रीच्या जेवणात आम्ही त्याच्याच बागेतली कारली केली होती,” ते म्हणतात.
हे सगळं नुकसान सहन करत असतानाच यास चक्रीवादळामुळे आलेल्या भरतीचं पाणी जून महिन्यात संपूर्ण घोडामारा बेटावर भरलं. आणि त्यानंतर पावसाळ्यात धुंवाधार पाऊस झाला. या सगळ्या घटनांनी इतकी प्रचंड हानी झाली की राज्य प्रशासनाने जीवितहानी टाळण्यासाठी इथल्या रहिवाशांना दुसरीकडे हलवायला सुरुवात केली.
“[वादळ येऊन गेल्यानंतर] माझ्या दुकानात तेल आणि मीठ सोडलं तर दुसरं काहीही राहिलं नव्हतं,” मंदिरताला परिसरातल्या एका किराणा दुकानाचे मालक, अमित हलदर सांगतात. “सगळं काही भरतीच्या लाटांमध्ये वाहून गेलं. आमच्या गावातल्या म्हाताऱ्या कोताऱ्यांनीही आजवर असल्या लाटा पाहिल्या नव्हत्या. लाटा इतक्या उंच होत्या की आमच्यापैकी किती तरी जणांना झाडावर चढून बसावं लागलं होतं. काही बायांना बेटावरच्या उंचाकडच्या भागातल्या झाडांना बांधून घातलं होतं, जेणेकरून त्या वाहून जाणार नाहीत. पाणी पार त्यांच्या गळ्याशी आलं होतं,” हलदर सांगतात. “आम्ही आमची गाई-गुरं काही वाचवू शकलो नाही.”
सुंदरबनमध्ये वातावरण बदलांच्या संकटाचे परिणाम समजून घेण्यासाठी २०१४ साली एक अभ्यास करण्यात आला. त्यानुसार समुद्राची वाढती पातळी आणि पाण्याचे प्रवाह आणि वाऱ्यांच्या विशिष्ट परिस्थितीमुळे घोडामाराच्या किनाऱ्यांवर प्रचंड धूप झाल्याचं दिसून आलं आहे. १९७५ साली या बेटाचं क्षेत्रफळ ८.५१ चौ.किमी होतं ते २०१२ साली ४.४३ चौ.किमी इतकं कमी झालं आहे. सातत्याने होणारं विस्थापन आणि इथल्या परिसंस्थेचं झालेलं अपरिमित नुकसान यामुळे इथून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे. २००१ ते २०११ या काळात घोडामाराची लोकसंख्या ५,२३६ वरून ५,१९३ इतकी कमी झाली आहे आणि स्थलांतरामुळेच हे झालं असावं असं या अभ्यासाचे लेखक सांगतात.
असं सगळं आक्रित घडत असतानाही, घोडामाराच्या लोकांनी मात्र एकमेकांची साथ सोडलेली नाही. सप्टेंबर महिन्यात मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा हाथकोलाच्या निवारा केंद्रात सगळे जण सहा महिन्यांच्या अविकच्या अन्नप्राशन कार्यक्रमाची तयारी करत होते. बाळ पहिल्यांदा भात खातं तो हा विधी. भूभागच आकसत जात असल्यामुळे पर्यावरणीय संकटांमुळे निर्वासित झालेले हे लोक आपल्या आयुष्यातल्या अनिश्चिततेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतायत – आणि मग ते पुन्हा पुन्हा नव्याने आपली घरं उभी करतात किंवा नव्या निवाऱ्याच्या शोधात दुसरीकडे रहायला जातात.

भरती ओसरल्यानंतर घोडामाराचे रहिवासी काकद्वीप वरून फेरीने परत येतायत

या वर्षी २६ मे रोजी यास चक्रीवादळ आणि भरतीचं पाणी बेटाचे बांध मोडून आत शिरलं आणि सगळंच पाण्याखाली गेलं

पुराचा सतत धोका असणाऱ्या या बेटावरचे रहिवासी खुल्यावर राहतायत, पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करण्याची आशा मनात घेऊन

खाशीमारामधल्या आपल्या घराच्या रम्य स्मृती मनात जपत शेख सनुज कायमसाठी घोडामारा सोडून सागर बेटावर स्थलांतर करणार आहेत

खाशीमारा घाटावर लोक अन्नाच्या प्रतीक्षेत, यास चक्रीवादळाने त्यांच्या घरांची नासधूस केल्यानंतर ते फक्त इतरांनी केलेल्या मदतीवर दिवस काढतायत

अन्नधान्य आणि रेशन बोटीतून खाशीमारा घाटावर पोचवण्यात येतंय

बोटीतून खाली उतरणारे गडी, बाया, लेकरं आणि शेरडं – सगळेच आपल्या घरी परतण्याच्या घाईत

मंदिरताला बाजाराच्या जवळच्या टँक मैदानात उभारण्यात आलेलं तात्पुरतं निवारा केंद्र. घोडामारा बेटावरची ही सगळ्यात उंचावरची जागा आहे. गावातले जवळपास एक तृतीयांश लोक इथे रहायला आले आहेत

अमित हलदर यांचं घर पुरतं मोडून पडलं आहे. मंदिरताला बाजाराजवळच्या त्यांच्या किराणा दुकानातला सगळा माल वाहून गेलाय

खासीमारा घाटाजवळच्या एका घरात भिजलेल्या जमिनीवर माती टाकून घर राहण्याजोगतं करण्याची धडपड सुरू आहे

हाथकोलाजवळच्या निवारा केंद्राजवळ ठाकूरदासी घोरुई माश्याची जाळी विणतायत. शासनाकडून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला दुसरीकडे जागा देण्यात येणार आहे

हाथकोला निवारा केंद्रातल्या काकोली मोंडल (केशरी साडीत). ज्या ३० कुटुंबांना सागर बेटावर हलवण्यात येणार आहे, त्यात त्यांचाही समावेश आहे

खासीमाराचे अब्दुल रौफ सागर बेटावर त्यांना देण्यात आलेल्या जमिनीची कागदपत्रं दाखवतायत

९ सप्टेंबर रोजी सहा महिन्यांच्या छोट्या अविकचा अन्नप्राशन विधी होणार आहे. त्या आधी तो आपल्या आईसोबत हाथकोलाच्या निवारा केंद्रामध्ये दिसतोय. केंद्रातले बाकी लोक जेवणाची तयारी करतायत

मंदिरताला बाजाराजवळ टँक मैदानावरच्या निवारा केंद्रामध्ये जेवणासाठी थांबलेल्या लोकांची लांबच लांब रांग

खासीमारा घाटावर अन्नाची आणि रेशनची पाकिटं घ्यायला आलेले लोक

सामाजिक संस्थेकडून देण्यात येणाऱ्या साड्या घेऊन जाणाऱ्या बाया

कोलकात्याहून आरोग्य कार्यकर्त्यांचा एक गट आठवड्यातून एक दिवस मंदिरताला जवळच्या घोडामाराच्या एकुलत्या एक प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देतो. एरवी काही गरज लागली तर लोक आशा कार्यकर्त्यांची मदत घेतात

९ सप्टेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण सुरू होतं. घोडामारामध्ये आजवर अशी १६ शिबिरं होऊन गेली आहेत

घोडामाराच्या मड पॉइंट पोस्ट ऑफिसातल्या पोस्टमास्टरांना कामावर जाण्यासाठी बारुईपूरहून रोज ७५ किमी प्रवास करावा लागतो. इंग्रजांनी दिलेलं नाव आजही या पोस्ट ऑफिसाने बदललेलं नाही. हवा इतकी दमट असते की पोस्ट ऑफिसातले कागद आणि फायली ओले होतात. सुकवायला म्हणून सगळं बाहेर काढून ठेवलंय

अहल्या शिशु केंद्रातल्या एका वर्गात आता खाटा टाकल्या आहेत आणि भाजीपाला ठेवला आहे. कोविड-१९ची साथ पसरल्यापासून मंदिरतालातली शाळा बंद आहे

खाऱ्या पाण्यामुळे खराब झालेली तांदूळ आणि गव्हाची पोती खासीमाराच्या रेशन दुकानामागे एका सुपारीच्या वाडीत वाळायला ठेवली आहेत. सडत चाललेल्या धान्याचा वास हवेत भरून राहिलाय

वादळात मोडून पडलेल्या झाडाचं खोड तरी वाचवावं अशी गावातल्या काहींची धडपड सुरू आहे

चुनपुरीचे रहिवासी मासे धरण्यासाठी जाळी टाकतायत. घोडामारामध्ये जगण्याचा संघर्ष सुरूच आहे