‘काले कानून वापस लो, वापस लो’. प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी मुंबईचं आझाद मैदान शेतकऱ्यांच्या घोषणांनी दुमदुमून गेलं होतं.
संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाने आयोजित केलेल्या या धरणं आंदोलनासाठी हजारो आंदोलक आले आहेत. महाराष्ट्राच्या २१ जिल्ह्यातून आलेलेल हे आंदोलक दिल्लीच्या वेशीवरच्या शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी नाशिकहून १८० किलोमीटरचा प्रवास करून इथे पोचले आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून पंजाब आणि हरयाणाचे आणि इतर राज्यांतले लाखो शेतकरी दिल्लीच्या विविध सीमांवर आंदोलन करत आहेत. ५ जून २०२० रोजी वटहुकुमाद्वारे लागू करण्यात आलेले हे कायदे १४ सप्टेंबर रोजी संसदेत विधेयक म्हणून सादर झाले आणि या सरकारने त्याच महिन्याच्या २० तारखेला ते कायदे म्हणून पारित देखील केले.
शेतकरी या तीन कायद्यांचा विरोध करत आहेतः शेतमाल व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व समन्वय) कायदा, २०२०, शेतकरी (सक्षमीकरण व संरक्षण) हमीभाव व कृषी सुविधा करार कायदा, २०२० आणि अत्यावश्यक वस्तू (सुधारणा) कायदा, २०२०. या कायद्यांमुळे कोणाही भारतीय नागरिकाला कायदेशीर मार्गांचा अवलंब करता येणार नाही आणि या तरतुदीने भारतीय संविधानातल्या अनुच्छेद ३२ चाच अवमान होत असल्याने त्यावर टीका होत आहे.
२४-२५ जानेवारी रोजी आझाद मैदानात झालेल्या या दोन दिवसांच्या आंदोलनाची ही काही क्षणचित्रेः

२४ जानेवारीच्या सकाळी काही शेतकरी मोर्चा काढून येतायत, तर आधीच इथे पोचलेले काही प्रवासाचा शीण जावा म्हणून आराम करतायत

अरुणाबाई सोनवणे (डावीकडे) आणि शशिकला गायकवाड औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातल्या चिमणपूरहून आल्या आहेत. भिल आदिवासी असणाऱ्या या दोघी वन हक्क कायदा, २००६ खाली त्यांच्या जमिनीचा मालकी हक्क मागत आहेत आणि नव्या तीन कायद्यांना विरोध नोंदवत आहेत. “आम्ही जास्त संख्येने आलो तर दबाव आणखी वाढेल,” अरुणाबाई म्हणतात. “म्हणून आम्ही इथे आलोय.”

मैदानात घोषणा दुमदुमतायतः ‘काले कानून वापस लो, वापस लो’.

नांदेड, नंदुरबार, नाशिक आणि पालघरचे शेतकरी २४ जानेवारीच्या रात्री मोर्चा काढून आझाद मैदानात आले. नाशिकहून आलेली त्यांची वाहनं अलिकडेच लावली आहेत

मथुराबाई संपतगोढे, वय ७० (डावीकडे) आणि दांगुबाई शंकर आंबेकर, वय ६५ नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्याच्या धोडंबे गावाहून इथे आल्या आहेत. मुंबईच्या गारठ्यात त्यांची रात्रीचा जामानिमा केला आहे.

दहा वर्षांच्या अनुष्का हडकेला (निळी शाल पांघरलेली) थंडी वाजतीये. ती पालघर जिल्ह्याच्या खारिवली तर्फ कोहोज गावाहून आपली आजी, पन्नाशीच्या मनीषा धानवा (केशरी शालीत) यांच्यासोबत आली आहे. तिची आई, अस्मिता (पिवळ्या शालीत) शेतमजूर आहे. “आम्हाला जमीन नाही. आम्ही दिवसभर मजुरीच करतो,” मनीषा सांगते. ती एकटी अनुष्काचा संगोपन करते.

पालघरहून आलेल्या शेतकऱ्यांनी सोबत तांदळाच्या भाकरी आणल्या आहेत

२४ जानेवारीचा मोठा दिवस सरत आला, काही जण निजलेत तर काही जण रात्री उशीरापर्यंत जोरदार घोषणा देतायत

नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातल्या संगमनेरमधले शेतकरी मंचावर सुरू असणारे कार्यक्रम बारकाईने ऐकतायत

लक्ष्मण फुला पसादे, वय ६५ नाशिकच्या गंगा म्हाळुंगीहून आले आहेत. ते मंचावरच्या कार्यक्रमात सहभागी होतात आणि नाचू लागतात

२५ जानेवारी रोजी दुपारी भाषणं ऐकत असलेले शेतकरी. त्यानंतर ते मुंबईत राज्यपालांच्या निवासस्थानी, राज भवन इथे मोर्चा नेणार आहेत

२५ जानेवारी, दुपारी मुंबईत राज्यपालांच्या निवास स्थानी, राज भवन इथे मोर्चा निघाला आहे. (अधिकाऱ्यांनी परवानगी न दिल्यामुळे हा मोर्चा नंतर रद्द करण्यात आला.)

२५ जानेवारी, दुपारी मुंबईत राज्यपालांच्या निवास स्थानी, राज भवन इथे आझाद मैदानातून मोर्चा निघण्याच्या तयारीत. (अधिकाऱ्यांनी परवानगी न दिल्यामुळे हा मोर्चा नंतर रद्द करण्यात आला.)

२५ जानेवारी, दुपारी मुंबईत राज्यपालांच्या निवास स्थानी, राज भवन इथे आझाद मैदानाच्या बाहेर पडलेला शेतकऱ्यांचा मोर्चा. परवानगी न दिल्यामुळे हा मोर्चा ५०० मीटर अंतर जाऊ शकला. तिथे निदर्शनं करून परत मैदानात वापस आला.
अनुवादः मेधा काळे