पश्चिम बंगालच्या बिरभूम जिल्ह्यामध्ये राजमहाल रांगांच्या पूर्वेकडच्या टेकड्या पहायला मिळतात. इथल्या सुपीक पठारी भूमीवर कधी काळी लाव्हा रस वाहत येऊन जास्तीत जास्त ५०० मीटर उंच असणारे हे सडे तयार झाले असावेत. या टेकड्यांमध्ये ज्वालामुखीतून तयार झालेला काळा पाषाण आढळतो. खूप पूर्वी इथे हत्ती, वाघ, अस्वलं, बिबटे, हरणं आणि इतरही अनेक वन्यजिवांची वस्ती होती.
बिरभूमच्या नलहाटी तालुक्यातल्या अशी टेकड्यांपैकी एक म्हणजे बोरुडी पहाड. इथला दगड रस्ते बांधणीसाठी, रेल्वेच्या रुळांखाली अंथरण्यासाठी आणि इमारतीच्या बांधकामावर बारीक खडी करून वापरला जातो. अगदी ३० वर्षांपूर्वीपर्यंत या डोंगरांवरच्या सड्यांवर जंगल तरी होतं किंवा संथाल लोक तिथे शेती करत होते. त्यानंतर मात्र तिथे दगडखाणी आल्या आणि भारतभरातल्या रस्ते बांधणी आणि एकूणच तेजीत असलेल्या बांधकाम क्षेत्रासाठी लागणारा दगड इथून खोदला जाऊ लागला. सुरुंग लावून स्फोट केल्यानंतर जवळच्या खडी केंद्रांवर त्याची बारीक खडी पाडली जाते आणि इथून तो बाहेर पाठवला जातो.
२०१५ साली एप्रिल महिन्यात ढगाळ वातावरणात केलेली ही सफर तुम्हाला टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या भबानंदपूर गावापासून ते वरती बोरुडी पहाड पर्यंत सैर करून आणेल.
मजुरांमध्ये जास्तकरून संथाल – बाया, गडी आणि तरुण मुलांचा समावेश आहे, ज्या गावातली शेतंभातं या उद्योगाने उद्ध्वस्त केली तिथलीच ही माणसं. बहुतेक जण स्थानिक आहेत पण काही जण झारखंडमधून आलेत जे काहीच किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि तिथेही खाणकामाने गावं उद्ध्वस्त झाली आहेत आणि शेतीवर आधारित उपजीविका नष्ट झाल्या आहेत. संरक्षक साहित्य म्हणून ते ज्या काही गोष्टी वापरतात त्या कामचलाऊ आहेत. पायात बूट, हेल्मेट, तोंडावरचा संरक्षक मास्क, शौचालय आणि पाण्याची सोय, वैद्यकीय सुविधा आणि अपघात झाल्यास भरपाई अशा कोणत्याही सुविधा खाणमालक पुरवत नाहीत.
घासीराम हेम्ब्रोम या सामाजिक कार्यकर्त्याने सांगितलं की २०१४ च्या जून महिन्यात भबानंदपूरची एक संताल महिला या रस्त्याने जात असताना भर दिवसा खडी केंद्रचालकाने तिला पकडून तीन तास तिच्यावर बलात्कार केला. ती इतकी घाबरली होती की त्याच्याविरुद्ध तक्रार देण्याची तिची हिंमत झाली नाही.
एवढा रस्ता पार केल्यानंतर आमचं वाहन खाण उद्योगाच्या काही कचेऱ्यांजवळून पुढे गेलं. तिथे फोटो काढणं हिताचं नव्हतं. या सगळी भाग दगडखाण “माफियां”च्या ताब्यात आहे आणि कॅमेरा घेऊन आलेल्या बाहेरच्या कुणालाही मारहाण करायला ते पुढे मागे पाहत नाहीत. त्यामुळे इथून पुढचं छायाचित्र आहे बोरुडीच्या वरच्या चंदननगर या पहिल्या गावाचं. तिथून भबानंदपूर कसं दिसतं ते पहा.

भबानंदपूर ते बोरुडी पहाडचा रस्ता, वरच्या छायाचित्रात डावीकडे रस्ता वर चढत जाताना दिसतोय. पुढे तो उजवीकडे वळून खडी केंद्रांमधून पुढे टेकडीवर जातो

बोरुडी पहाडाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या उजवीकडून भबानंदपूरकडे नजर टाकली तर दिसणारं दृश्य. समोरच्या बाजूला दिसणारे पत्थर बोरुडीतून खोदून काढलेत आणि इथे आणून टाकलेत, आता त्याच्या ठिकऱ्या केल्या जातील

रस्त्याच्या डावीकडून असं दृश्य दिसतंय (वरती) ज्यात बोरुडी पूर्णपणे दबून गेलंय – या गावाच्या पोटातून जी काही दगड-माती खोदून बाहेर काढलीये ती जिथे जागा मिळेल तिथे ढीग करून ठेवलीये, ही सगळी टेकडी म्हणजे राडारोड्याचे ढीग बनलीये

खडी यंत्राचं जवळून दिसणारं चित्र, एका सरकत्या पट्ट्यावर दगड लादले की तो वरती जातो आणि मग त्याच्या ठिकऱ्या होतात. मजूर पट्ट्यावर दगड लादतात, अनेकदा ते स्वतःच त्या पट्ट्यांमध्ये अडकतात आणि त्यांचा चेंदामेंदा होतो

या छायाचित्राच्या शेजारी उजवीकडे खाणीच्या भिंती आहेत. दूरवर दिसणारी धूळ खडी केंद्रांवरची आहे जी आताच आपण पाहिली

खाणीतून निघालेली दगड आणि माती जिथे शक्य आहे तिथे ढीग रचून ठेवलीये. ही कधी काळी शेतं होती. काल रात्री पाऊस झाल्यामुळे एरवीपेक्षा धूळ जरा कमी आहे.

चंदननगर गाव आता एक बेट बनलंय, चारही बाजूंनी खाणींनी वेढलेलं गावापासून खाण वेगळी करणारा एक रस्ता तेवढा आहे जो आता माझ्या मागे आहे – आणि बाकी सर्व बाजूंनी खडी केंद्रं. इथे तब्बल ६६ कुटुंबं राहतात . या गावात सहा “क्षया”चे रुग्ण आहेत कारण या भागातले डॉक्टर सिलिकॉसिसचं निदान क्षयरोग असंच करतात. काला आजार आणि कावीळही सर्रास आढळतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला तांबट पक्ष्याचा आवाज येऊ लागला. डोंगरावरच्या तुरळक हिरवाईत या पक्ष्याने आसरा घेतला होता

या आधीच्या छायाचित्रात दिसणाऱ्या रस्त्याच्या दुसऱ्या टोकाकून दिसणारं दृश्य

चंदननगरच्या देवराईतून दिसणारं दृश्य, इथे पूर्वी धार्मिक विधी केले जायचे. छायाचित्राच्या डावीकडे प्राथमिक शाळा आहे, तीही खडी केंद्रांनी वेढली गेलीये. खडी फोडण्याचा आवाज सतत आणि कान किटून टाकणारा आहे. इथे ढीग दिसतोय ती बारीक खडी आणि सिमेंट एकत्र करून बांधकामासाठी उत्तम माल तयार होतो. म्हणूनच घर बांधणी क्षेत्रातल्या लोकांना या उद्योगाचं फार प्रेम आहे

चंदननगरमधला भाजीचा मळा. कुंपणाच्या आतली रोपं बहुतेक वांग्याची आहेत

गावात पलिकडच्या बाजूलाही काही शेतं आहेत. आम्ही ज्या रस्त्याने जात होतो त्याच्या समोरच्या बाजूला आणि सुमारे ५० मीटर मलब्याच्या पलिकडे ही शेतं होती. शेतांमधून हे असं दृश्य दिसत होतं. इथे अत्यंत चिवट असंच गवत तगून राहू शकतं हे काही सांगण्याची आवश्यकता नाही. ही धूळ कोणत्याही सजीवासाठी जीवघेणी आहे. आणि जिथे ही खूप जास्त आहे तिथे तर काहीच फार काळ जगू शकत नाही

शेताच्या बांधावरून दिसणारं दृश्य. धुळीच्या भयाने मी शेताबाहेर पाऊल टाकण्याचं धाडस केलं नाही तरीही थोड्याच वेळात मी खोकायला सुरुवात केली होती

चंदननगरच्या रस्त्याच्या कडेला मुलं थांबलीयेत. ही दोन ताडाची छोटी झाडं दबून टाकणाऱ्या मलब्याच्या पलिकडे दगडखाण आहे. ही खाण आणि गावाच्या मधून जाणाऱ्या दगडाच्या ढिगाऱ्यामधल्या फटीतून दिसणाऱ्या रस्त्यावर दगड वाहून नेणाऱ्या ट्रकची दिवसभर येजा सुरू असते

परन मड्डी कधी काळी आपल्या कुटुंबाचं शेत असलेल्या या एकूण १०० बिघा (अंदाजे ३३ एकर) जमिनीसमोर उभे आहेत. माफियांनी सरळ इथे खोदकाम सुरू केलं आणि जेव्हा त्यांच्या भावाने विरोध केला तेव्हा ते सरळ त्यांच्या व़डलांना म्हणाले, “तुम्हाला तुमची जमीन हवी आहे का मुलगा? आम्ही एक काही तरी देऊ.” या कुटुंबाला कसलीही भरपाई मिळालेली नाही.

परन मड्डी आणि इतरांच्या शेतांची ही अवस्था झाली आहे – १०० मीटरहून खोल खाण. उजवीकडच्या कोपऱ्यात पलिकडच्या बाजूला अशीच आणखी एक खाण आहे. या खाणींनी बोरुडीच्या इतक्या चिरफाळ्या झाल्या आहेत की आत कप्पे असणाऱ्या रिकाम्या पुठ्ठ्याच्या खोक्यासारखी या टेकडीची गत झाली आहे. पेल्यांचे खोके कसे असतात तशी, कप्प्यांच्या कडा म्हणजे रस्ते. याच रस्त्यावरून आम्ही लोखनामारा पाड्यावर जाणार आहोत. हा पाडा चार खोल खाणींच्या मधोमध टिकून आहे. गाव आणि रस्त्यांची पातळी अर्थातच पूर्वीसारखीच आहे, बहुतकरून सपाट, बोरुडी पहाडाचं पठार जे आता भारतभरात रस्ते आणि मॉल उभारायला मदत करतंय

लोखनमाराच्या वाटेवर, छायाचित्राच्या उजव्या बाजूला खाणींचे कडे नजरेस पडतील. घासीराम हेम्ब्रोम सांगतात की फक्त गेल्या एका वर्षात चंदननगर आणि लोखनमारातल्या सहा जणांचा खाणीत पडून जीव गेलाय. काही जण ट्रकला वाट द्यायला कडेला सरकले कारण ही वाहनं कुणासाठीही वेग कमी करत नाहीत. दिवे म्हणजे निव्वळ भोकं आणि नंबर प्लेटचा पत्ताच नसतो

लोखनमारा, सर्व बाजूंनी खाणींनी वेढलंय. या पाड्यावर ५० घरं आहेत आणि दुसऱ्या एकावर १००, तिथे काही आम्ही गेलो नाही. लोखनमारामध्ये १२ “क्षयाचे” रुग्ण आहेत पण सगळ्यात मोठा धोका आहे तो म्हणजे खाणीत पडण्याचा

लोखनमारात कपडे वाळतायत

या खाणीनी एका झोपडीचा घास घेतलाय, जिच्यात उभी राहून मी हे छायाचित्र घेतलंय. इथल्या रहिवाशांनी संरक्षण म्हणून एक हलका पत्रा मारलाय

कुंपणापलिकडे थेट खोल

मागे वळून पाहता, क्षितिजावर चंदननगरचा नजारा. इतक्यात झालेल्या पावसामुळे झाडांच्या पानांवरची धूळ धुऊन गेलीये

लोखनमारामधून दिसणारं लोखनमाराचंच चित्र. या छायाचित्रात डाव्या बाजूला दिसणारी ही झाडं कधी काळी गावाची मसणवट होती तिथे वाढली आहेत

लोखनमारा गावची मसणवट, कोण जाणे का पण खाणमालकांनी ही शाबूत ठेवलीये. लोखनमाराच्या झोपड्यांपासून ही दूर गेलीये, मध्ये एक वापरात नसलेली खाण आहे जिच्यात थोडं पाणी साचलंय. खाणीची कड १०० मीटरहून जास्त खोल आहे त्यामुळे तिथल्या थडग्यांपर्यंत कुणीच जाऊ शकत नाही. मृतांचं दफन करता येईल अशी गावात कोणतीच इतर जागा नाही – विधी करण्यासाठी साधी देवराईही नाही

लोखनमारातल्या पुरुष मंडळींना खाणमालकांकडून पैसा मिळाला. मोटरसायकली, स्मार्ट फोन आणि दारूसाठी पुरेसा असला तरी त्यांच्या आयुष्याला उभारी देण्यात तो कमीच पडला. सूर्य माथ्यावर आलाय, पण बहुतेक सगळे दारूच्या किंवा इतर नशेत असल्यासारखे दिसतायत. लोखनमारा पाड्यावर फक्त ५० घरं असली तरी ३० विधवा स्त्रिया आहेत. दारूचं व्यसन, खाणीत पडल्याने किंवा आजारपणामुळे त्यांच्या नवऱ्यांचं निधन झालंय. मोजक्याच स्त्रिया दिसतायतः बहुतेक जणी खडी केंद्रावर काम करून घर चालवायला हातभार लावतायत. आणि याच क्षणी काही पुरुष आक्रमक होऊन आम्ही काय करतोय हे विचारू लागतात, त्यामुळे आम्ही त्याच रस्त्याने परतीच्या वाटेवर निघतो

रस्त्याचा नजारा, चंदननगरच्या वाटेवर, एका चौकातून दिसणारा. तिथे शेजारी एक खाण आहे. या छायाचित्रात दिसणारी खाण आता वापरात नाही त्यामुळे त्यात पावसाचं आणि आणखीन कुठकुठून वाहत येणारं पाणी जमा झालंय. पण ते इतकं खोल आहे की गावकऱ्यांना तसाही त्याचा काही उपयोग नाही

भबानंदपूरजवळ खडी केंद्रापाशी थांबणं हिताचं नाही, खाणमाफियांची भीती आहेच. मी केवळ गाडीच्या काचेतून समोरची दृश्यं कॅमेऱ्यात टिपू शकतीये

काही मजूर दिसायला इतके किरकोळ आहेत, ती मुलंच असावीत

बाया, गडी आणि बहुतेक छोटी मुलंही काम करतायत

तर आता आम्ही भबानंदपूरमध्ये प्रवेश करतोय. खाण आणि खडी केंद्राच्या मागेच हे गाव आहे. कधी काळी अस्तित्वात असलेलं बोरुडी पहाड कधीच मागे पडलंय. आता भारताच्या पूर्वेकडच्या राज्यांमधली नेहमीची शेतं, विहिरी, शेरडं आणि लेकरं पाहत आम्ही पुढे चाललोय. थोड्याच वेळात मृत्यूचा तो डोंगर मागे पडत नजरे आड होईल. आणि ज्या गगनचुंबी इमारतींमध्ये आम्ही राहतो, ज्या चौपदरी महामार्गांवरून आम्ही वेगाने भारताच्या भविष्याकडे निघालोय त्याच्यामागचं वास्तव आता आम्हाला छळणार नाही
अनुवादः मेधा काळे