‘या ठिकाणची सगळ्यात उंचावरची जागा म्हणजे हे देऊळ. गाभाऱ्यातली मूर्तीदेखील खांद्यापर्यंत पाण्यात बुडालेली. चोहीकडे फक्त पाणीच पाणी! गावातले सगळे जण कोरड्या भूमीच्या शोधात बाहेर पडलेत, घरटी एक माणूस घराची राखण करायला मागेच थांबलंय. देवळाच्या आवारात असणाऱ्या तीन खणी वाड्यात वरच्या मजल्यावर ६७ मुलं आहेत. आणि ३५७ मोठी माणसं. कुत्री, मांजरं, शेरडं आणि कोंबड्यासुद्धा... ’
१९२४ साली आलेल्या महापुरावर आधारित थकळी शिवशंकर पिल्लई यांच्या ‘पूर’ या गोष्टीची सुरुवात या वाक्यांनी होते.
आणि मुलांनी काढलेल्या या चित्रांमध्ये, आकाशातून धो धो पाणी पडतंय, नद्यांमधून वाहतंय, घरं आणि शेतं वेढून टाकतंय. त्यांची चित्रं त्यांनी अनुभवलेल्या भयकारी पुराबद्दल बोलतायत.
फरक इतकाच, ही चित्रं १०० वर्षांनंतर काढली गेलीयेत. जुलै-ऑगस्ट महिन्यात झालेल्या अभूतपूर्व पावसानंतर केरळमध्ये आलेल्या या शतकातल्या प्रलयंकारी पुरानंतर.


डावीकडेः अनेक संघटनांनी गावात अन्न आणि पाणी पोचवलं. उजवीकडेः महादेवीकाड गावातल्या सरकारी शाळेत ३६२ पूरग्रस्त कुटुंबांनी आश्रय घेतला
कुट्टनाड विभागात (केरळच्या अळप्पुळा, कोट्टायम आणि पठणमथिट्टा जिल्ह्यांना व्यापणारा प्रदेश) सर्वप्रथम जुलैच्या मध्यावर पूर आला – पाणी हळू हळू वाढतच होतं, गढूळ आणि भयकारी – आणि मग शाळा आणि सरकारी कार्यालयांचं रुपांतर पुनर्वसन शिबिरांमध्ये झालं.
२८ जुलै रोजी मी कार्तिकपल्ली तालुक्यातील महादेवीकाड गावातल्या सरकारी माध्यमिक शाळेत भरलेल्या शिबिरात गेलो होतो. खूप पूर्वी मी स्वतः या शाळेचा विद्यार्थी होतो आणि जुलै-ऑगस्ट २०१८ मध्ये या शाळेने ३६२ पूरग्रस्त कुटुंबाना आसरा दिला होता.
या शिबिरात आजूबाजूच्या गावांमधल्या शेतमजुरांची २३ मुलंदेखील होती. त्यांच्यातले बहुतेक उदास होते, आणि संपूर्ण शिबिरावरच उदासीची कळा पसरली होती. दुसऱ्या दिवशी मी शाळेत रंगकामाचं साहित्य घेऊन गेलो. काय चालू आहे या उत्सुकतेने मुलं गोळा झाली आणि मी त्यांना कागद, पेन आणि खडू दिले. आणि लगेचच कागदावर रंगीबेरंगी घरं, शेतं, सूर्य, पाखरं, झाडं, ढग, फुलपाखरं, रोपं, माणसं उमटू लागली... आणि उमटलं, पाणी. आपल्या लेकरांनी काढलेली चित्रं पाहून त्यांच्या आयांना रडू आवरलं नाही.


डावीकडेः ओणमच्या दिवशी, २४ ऑगस्ट रोजी मुलांनी काढलेल्या चित्रांनी शाळेच्या भिंती सजल्या होत्या. उजवीकडेः पाणी ओसरल्यानंतर काही कुटुंबं शिबिरातून त्यांच्या घरी रवाना झाली
आम्ही २४ ऑगस्ट रोजी, ओणमच्या दिवशी मुलांची चित्रं शाळेच्या भिंतीवर लावली – या वर्षीचा ओणम साधा, निःशब्द होता. या रंगीबेरंगी चित्रांनीच त्यात थोडे रंग भरले.
मुलांनी पुराबद्दल काही लिहिलंदेखील. त्यांनी त्यांच्या वह्यांमध्ये मल्याळममध्ये लिहिलेल्या मजकुराचं हा अनुवादः
पुराची रोजनिशी
“हळू हळू, पाणी चोहीकडून आम्हाला वेढू लागलं. ते आमच्या घरापर्यंत आणि कोपऱ्यापर्यंत आलं. मच्छिमारीच्या मोठ्या बोटीतून आम्हाला सोडवायला कार्यकर्ते आले. आम्हाला घर सोडून जायचं जिवावर आलं होतं पण पाणी आणखी वाढेल अशी भीती होती त्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर गेलो. आम्हाला त्यांनी पय्यिपाड पुलापाशी सोडलं तिथून आम्ही केएसआरटीसी (केरळ राज्य परिवहन मंडळ) बस पकडली आणि महादेवीकाड शाळेपाशी उतरलो. आम्ही इथे पोचताच आम्हाला त्यांनी कपडे दिले आणि खायला दिलं. आम्ही खाऊन झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी आम्हाला नाश्त्याला उपमा आणि दुपारी जेवायला भात दिला. रात्रीदेखील आम्ही भातच खाल्ला आणि निजलो. आम्हाला सारखं काही तरी खायला देतायत. आम्ही या शिबिरात अगदी मज्जेत राहतोय.”
- अभिजित एस, वय १३, मु. पो. चेरुताना-अयपरंपु, ता. हरिपाद, जि. अळप्पुळा




मुलांची चित्रकला. वर डावीकडेः अभिजित एस (वय १३, इ. ८ वी), गाव वियापुरम. वर उजवीकडेः आकाश एम (वय १४, इ. ९ वी), गाव चेरुदाना. खाली डावीकडेः आर्या बी. (वय १२, इ. ७ वी), गाव नेडुमुडी. खाली उजवीकडेः अरोमल बी. (वय ८, इ. ३ री), गाव नेडुमुडी
“स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी माझ्या घरात पाणी भरलं होतं. जसजसं पाणी माझ्या घरात शिरायला लागलं, मला मज्जा वाटत होती की आज सुटी मिळणार. माझे आई आणि बाबा घरातलं सामान पाण्यापासून उंचावर ठेवत होते. पण जेव्हा आमचा दिवाणच पाण्यात गेला तेव्हा आम्ही आमच्या नातेवाइकांच्या घरी गेलो, ते जरा चढावर राहतात. लवकरच तिथेही पाणी चढायला लागलं. आम्ही जेव्हा बाहेर पडलो तेव्हा गळ्यापर्यंत पाणी आलं होतं. आम्ही चेरुदाना नदीपाशी पोचलो तेव्हा आमचे शेजारीपाजारी सुरक्षा बोटीची वाट पाहत होते. बोटीतला प्रवास भीतीदायक होता आणि मी घाबरून रडू लागलो. मी खूप खूप प्रार्थना केली. चेरुदाना पुलापासून आम्ही बसमध्ये बसलो आणि या शाळेत पोचलो.”
- अतुल मोहन, वय १०, मु. पो. चेरुदाना, ता. हरिपाद, जि. अळप्पुळा
“पुरानी आमच्यापुढे खूप समस्या उभ्या केल्या. आमच्या घरातल्या सगळ्या वस्तू आता पाण्याखाली आहेत.”
- अभिजित पी. वय १०, मु. चेरुदाना, ता. हरिपाद, जि. अळप्पुळा




डावीकडे, वरः अश्वथी बैजू (वय ९, इ. ४ थी), नेडुमुडी. उजवीकडे वरः अभिजित पी. (वय १०, इ. ५ वी), चेरुदाना खालीः डावीकडेः आदित्यन बैजू (वय ९, इ. ४ थी), नेडुमुडी. खाली डावीकडेः अखिलेश एस. (वय ६, इ. १ ली)
“मी १५ ऑगस्टला शाळेत जाऊ शकलो नाही – आमच्या घरात पाणी भरलं होतं. पाणी ओसरेल असं मला वाटत होतं. पण तसं झालं नाही. पाणी हळू हळू वाढतच चाललं होतं. संध्याकाळीदेखील तशीच स्थिती होती. आमचं नशीब चांगलं म्हणून रात्री पाणी वाढलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजताच पुराचं पाणी परत आमच्या घरात शिरायला लागलं. आधी स्वयंपाक घरात पाणी आलं, त्यानंतर बैठकीच्या खोलीत, मग इतर खोल्यांमध्ये... सगळीकडे. आमची दुसरी खोली जेव्हा निम्मी पाण्याखाली गेली तेव्हा आम्ही माझ्या धाकट्या चुलत आजोबांच्या घरी गेलो. आम्ही दोन-तीन दिवस तिथे राहिलो. तिसऱ्या दिवशी आमचे नातेवाईक आले. त्याच दिवशी माझ्या चुलत्यांच्या घरातही पुराचं पाणी शिरलं. आम्ही सगळेच दोन गटांमध्ये सुरक्षा बोटींमधून चेरुदाना पुलापाशी गेलो. आम्हाला त्यांनी पय्यिपाड पुलापाशी सोडलं. मग आम्ही केरळ राज्य परिवहन बसमध्ये चढलो. आम्ही [महादेवीकाड शाळेत] आलो तेव्हा तिथे कुणीच नव्हतं. इथे येणारे आम्ही पहिलेच होतो. निजण्यासाठी आम्ही जागा शोधली. थोड्या वेळाने आम्हाला जेवायला अप्पम आणि मटणाचा रस्सा मिळाला. रात्री कुणाचाच डोळा लागला नाही...”
- आकाश एम. वय १४, मु. चेरुदाना-अयपारम्पु, ता. हरिपाद, जि. अळप्पुळा


अतुल बाबू (वय ८, इ. ३ री), नेडुमुडी (डावीकडे), आणि गौरी माधव (वय ७, इ. २ री), पुलिनकन्नु (उजवीकडे)
“आमच्या घरी [जुलैमध्ये] पुराचं पाणी शिरलं त्याला महिना होऊन गेला. आम्हाला जवळच्याच घरात हलवण्यात आलं होतं. या [ऑगस्ट] महिन्याच्या १७ तारखेला, त्या घरातही पाणी शिरलं. मोठ्या मुश्किलीने आम्ही कशी बशी रात्र काढली. दुसऱ्या दिवशी आमच्या डोळ्यादेखतच पाण्याची पातळी वाढली. आम्ही सगळेच भीतीने रडू लागलो. त्यानंतर आमची सुटका करण्यासाठी मोठ्या गाडीतून पोलिस काका आले. आम्हाला कलारकोडे नावाच्या ठिकाणी सोडलं त्यांनी. आम्ही धक्क्यातून सावरलो नव्हतो आणि कुठे जावं तेच आम्हाला कळत नव्हतं. अप्पी (आत्या) म्हणाली की आम्ही तिच्या घरी कायमकुलमला जायला पाहिजे. म्हणून मग आम्ही एक मोठं वाहन केलं आणि तिकडे गेलो. तिथल्या ज्या दयाळू स्त्रिया होत्या त्यांनी आम्हाला या शाळेत पाठवलं. तेव्हापासून आजपर्यंत आम्हाला कसलीही अडचण आलेली नाही.”
अश्वथी बैजू, वय ९, मु. नेडुमुडी, ता चंपाकुलम, जि. अळप्पुळा


अळप्पुळा जिल्ह्यातल्या महादेवीकाड शाळेतल्या शिबिरामधल्या मुलांनी काढलेली चित्रं. वर (डावीकडून उजवीकडे): अक्षय आर., आकाश आर., अभिषेक, अरोमल प्रदीप, आदिरथ, अश्वथी बैजू. खाली (डावीकडून उजवीकडे): अतुल मोहन, अभिनव अनीश, आकाश आर. अभिमनु, अनीश एम., अभिनव पी., अवनी बैजू
२९ ऑगस्ट २०१८ रोजी महादेवीकाडमधली शाळा पुन्हा एकदा सुरू झाली, शाळेचे वर्ग भरले. तिथे आसरा घेतलेली काही मुलं आणि त्यांची कुटुंबं आपापल्या गावी परतली आहेत, बाकी काही दुसऱ्या निवारा शिबिरात गेली आहेत.
अनुवादः मेधा काळे